ओझर्डे धबधब्यावर महागाईच्या धारा
पाटण :
तालुक्यातील वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा तसेच पावसाळी पर्यटनाचे आकर्षण म्हणजे नवजा येथील ओझर्डे धबधबा. या महाकाय धबधब्याचे सौंदर्य नजरेत साठविण्यासाठी हजारो पर्यटक धबधब्याला भेट देत आहेत. मात्र यापूर्वी पर्यटकांसाठी खुला असणारा हा धबधबा पाहण्यासाठी आता दहा-वीस नाही तर प्रत्येकी रुपये शंभर मोजावे लागत असल्याने पर्यटकांवर महागाईच्याच धारा कोसळत असून पर्यटकांना महागाईनेच हुडहुडी भरत आहे.
तालुक्यात वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांना ओझर्डे धबधब्याला भेट दिल्याशिवाय पावसाळी पर्यटनाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळत नाही. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य तसेच पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येथे धाव घेणाऱ्या पर्यटकांना आता येथील महागाईने धाप लागू लागली आहे. वर्षा सहलीसाठी ओझर्डे धबधबा पाहण्यास येणाऱ्या बारा वर्षावरील मुलांसह सर्वांना प्रौढ मानून प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय डीएसएलआर कॅमेऱ्यासाठी शंभर व साध्या कॅमेऱ्यासाठी पन्नास रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. पर्यटनासाठी किमान पाच-सहा माणसांचे कुटुंब आल्यास पाचशे ते सहाशे रुपये केवळ प्रवेश करण्यासाठी भरावे लागत असल्याने बऱ्यापैकी पर्यटक लांबूनच धबधब्याचे दर्शन घेऊन माघारी फिरत आहेत.
ओझर्डे धबधबा केवळ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दोन तास वैध असणारी पावती प्रत्येकी शंभर रुपये घेऊन दिली जात आहे. मात्र या ठिकाणी आवश्यक स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, चेंजिंग रुम अशा किमान सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे हे शंभर रुपये शुल्क म्हणजे एक प्रकारची पर्यटकांची आर्थिक लूट ठरत असून स्थानिकांसह पर्यटक व सुरक्षा रक्षकांमध्ये सातत्याने वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत. याचा फटका कोयनेच्या पर्यटनाला तर बसणार नाही ना, याचाही विचार करण्याची गरज आहे. याशिवाय येथील सुरक्षा रक्षकांची पर्यटकांशी असणारी वागणूक चर्चेचा विषय असून पर्यटक व सुरक्षा रक्षकांत सातत्याने होणाऱ्या वादावादीच्या प्रकाराबाबत पर्यटक उघडपणे नाराजी बोलून दाखवत आहेत. याबाबत वेळीच लक्ष घातले नाही तर याचा परिणाम कोयनेच्या राहिल्या सुरल्या पर्यटनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच कोयना पर्यटनाला चालना देण्यासाठी शुल्क आकारणी कमी करावी तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांशी किमान सौजन्याने संवाद साधणाऱ्या सुरक्षा रक्षकांना तैनात करून जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. बोटिंगवरील बंदीसह निर्बंध यामुळे कोयनेकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असताना ओझर्डे धबधब्यावरील महागाईची यात भर पडली आहे.
- धबधब्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना
जलाशयातील बोटिंगवरील बंदीसह शासनाचे निर्बंध, उजाड पडलेली पर्यटन स्थळे यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यटनाला मरगळ आली. मात्र पावसाळ्यात ओझर्डे धबधब्यामुळे पर्यटक पुन्हा कोयनानगरकडे पुन्हा आकर्षित होत आहेत. वर्षा सहलीसाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक कोयनानगर येथे दाखल होताना हॉटेल, रिसॉर्ट तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना पुन्हा चांगले दिवस येऊ लागले असताना त्यांच्यासाठी पोषक वातावरण गरजेचे आहे.