म्हादईप्रश्नी विधानसभागृह समितीची बैठक जानेवारीत
प्रतिनिधी/ पणजी
म्हादईच्या प्रश्नावर गोवा राज्य विधानसभेत नेमण्यात आलेल्या सभागृह समितीची बैठक 10 जानेवारी 2025 रोजी बोलावण्यात आली असून ती सकाळी 11 वा. पर्वरी येथील विधानसभा संकुलातील पीएसी रुममध्ये होणार आहे.
गोवा विधिमंडळ सचिवालयाचे संयुक्त सचिव हर्क्युलस नोरोन्हा यांनी बैठकीची सूचना जारी करुन ती सर्व सदस्यांना पाठवली आहे. म्हादई पाणी वाटपाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून तो सुटलेला नाही. शिवाय हा विषय न्यायप्रविष्ट असून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्र सरकारने त्यावर तोडगा म्हणून ‘प्रवाह’ या विशेष प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतरही त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नसल्याचे समोर आले आहे. ‘प्रवाह’चे कार्यालय पणजीत असले तरी यापूर्वी झालेल्या दोन बैठका पणजीच्या बाहेर घेण्यात आल्या. त्यात गोव्याच्या बाजूला विशेष महत्त्व देण्यात आले नसल्याच्या तक्रारी विरोधी आमदार करीत आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी म्हादईच्या प्रश्नावर सभागृह समितीची बैठक बोलावण्याची वारंवार मागणी केली होती. त्याची दखल घेण्यात आली आणि एकदाची ही बैठक बोलावण्यात आली आहे.