कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा निवडणुका : बिहारचा ‘महाराष्ट्र’ होणार काय?

06:34 AM Oct 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आंतरराष्ट्रीय परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची बनत आहे. कालचे जिगरी दोस्त आज एकमेकांच्या नरडीचा घोट घेत आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील जोरदार लढाई त्याचीच साक्ष आहेत. तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे सर्वेसर्वा शी जीन पिंग यांची बैठक ‘अपेक’ च्या परिषदेत लवकरच होण्याची शक्यता आहे. ‘अपेक’ म्हणजे आशिया आणि प्रशांत महासागराच्या आसपास असणाऱ्या राष्ट्रांची संघटना. तेथील बैठकीत जर ट्रम्प आणि शी जीन पिंग यांची गट्टी जमली तर अमेरिका आणि चीनची बलशाली युती तयार होऊ शकते. असे घडले तर भारतासह इतर देश त्यात भरडले जाऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे. अशातच भारताने अमेरिकेशी व्यापार करार करण्यासाठी आपली टीम नुकतीच वॉशिंग्टनला पाठवली आहे. ती कितपत यशस्वी होऊन परतणार याबाबत साशंकता आहे. ट्रम्प यांनी साऱ्या जगाचेच राजकारण  ढवळून टाकलेले आहे. ते उद्या काय करतील याबाबत आज सांगणे जाणकारांना देखील कठीण होत आहे. गाझावरील शांती कराराने ट्रम्प यांचे हात अजूनच मजबूत झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गाझावरील जागतिक परिषदेला उपस्थित न राहिल्याने ते ट्रम्प यांना घाबरतात, असा दावा विरोधक करू लागले आहेत.

Advertisement

अशावेळी बिहारमध्ये विधानसभा निवडणूका होऊ घातलेल्या आहेत. तिथे मात्र वेगळेच वारे वाहताना दिसत आहे. 14 नोव्हेंबरला तेथील निकाल लागणार आहे आणि आजघडीला तिथे मोदी आणि भाजपचे पारडे जड दिसत आहे. उद्या काय होईल ते दिसेलच. पण आजमितीला भाजपने आखलेली रणनीती सफल होताना दिसत आहे. त्यांनी ज्या शिताफीने सत्ताधारी रालोआमधील सीट वाटप आपल्या सहकारी पक्षात केलेले आहे. त्याने मुख्यमंत्री नितीश कुमार निवडणुकीनंतर अडचणीत आले नाहीत तरच आश्चर्य होणार आहे. आजघडीला नितीश मुख्यमंत्री आहेत. गेली वीस वर्षे बऱ्याच हिकमती-दिकमती करून त्यांनी ते पद राखून बिहारच्या राजकारणात एक अजब विक्रम केलेला आहे. पण आता ते औटघटकेचेच मुख्यमंत्री राहणार आहेत अशी चर्चा निवडणूकीच्यापूर्वी वाढीस लागली आहे.

Advertisement

बिहारचे राजकारण एका वळणावर उभे आहे. कालचे नेते हळूहळू काळाआड जाण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. मंडळ मुद्याच्या जोरावर बिहारच्या राजकारणात एक चमत्कार म्हणून पुढे आलेले लालु प्रसाद हे आता प्रत्यक्ष राजकारणापासून एकप्रकारे दूर झालेले आहेत. त्यांची सारी मदार आता आपला मुलगा तेजस्वी यादवला पुढे आणण्यावर आहे. भावी मुख्यमंत्रीपद उमेदवाराच्या स्पर्धेत ते नेहमी पहिले येत असतात पण आतापर्यंत त्यांची गाडी ही उपमुख्यमंत्रीपदापर्यंतच धडकलेली आहे. सत्तरी पार केलेले नितीशदेखील तब्येतीने हैराण आहेत. त्यांचे वागणे बोलणे विचित्र होऊ लागल्याने त्यांच्या संयुक्त जनता दल या पक्षाला प्रचारात अडचण येत आहे, पण तसे जाहीरपणे सांगताही येत नाही आहे. राम विलास पासवान यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. काँग्रेसमध्ये राज्यपातळीवर कोणताच प्रभावी नेता राहिलेला नाही. राहुल गांधी यांच्यावरच त्याची मदार आहे.

गमतीची गोष्ट अशी की बिहार संक्रमण काळातून चालला आहे. नवीन नेत्यांचा उदय होत आहे. कालपरवापर्यंत निवडणूक तज्ञ म्हणून काम करत असलेले प्रशांत किशोर यांनी पदयात्रा करत राज्य पिंजून काढून बिहारवर आपली एक छाप टाकलेली आहे ते या निवडणुकीत दिसून येत आहे. किशोर हे येत्या निवडणुकीत ‘किंग’ बनणार नसले तरी किंगमेकर जरूर बनू शकतात, असे बोलले जात आहे.

त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुकीचे काम चालवले आहे त्यावरून ते सरतेशेवटी भाजपाला फायदा पोहचवतील अशी एक धारणा आहे. भाजपकडे राज्यभर माहित असलेला/नावाजलेला एकही नेता नाही हे तिचे वैगुण्य आहे. पण संक्रमण काळातील बिहारमध्ये कोणता मुद्दा पकड घेईल हे आत्ताच सांगता येत नाही. जातीपातीच्या राजकारणात विखुरलेला बिहार मात्र आपल्याला जाणीवपूर्वक मागे टाकले जात आहे अशा संशयाप्रती आलेला आहे.

243 सदस्यीय बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजप आणि नितीश यांचा संयुक्त जनता दल हे प्रत्येकी 101 जागा लढवणार आहेत तर 29 जागा मोदींचे ‘हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे चिराग पासवान यांना दिल्या गेल्या आहेत. गेल्या निवडणुकीत पासवान यांनी वेगळी निवडणूक लढवून नितीशच्या पक्षाचे बारा वाजवले होते. त्यांच्या पक्षाला फक्त 43 जागा आल्या होत्या. तरीही नितीशना मुख्यमंत्रीपद देणे भाजपला भाग पडले होते. प्रत्यक्षात भाजपला 142 जागा युतीच्या जागा वाटपात मिळालेल्या आहेत असे विरोधक देखील दावा करत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे नितीश यांच्याविरुद्ध भाजपने प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रीतीने ‘घेरा’ घातलेला आहे.

त्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात गेल्या वर्षी युतीला चांगले यश मिळून देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पायउतार व्हावे लागले होते. तद्वतच बिहारमध्ये नितीश यांना निवडणुकीनंतर पद्धतशीरपणे टाटा, बाय बाय केले जाऊ शकते. एकनाथ शिंदे हे धडधाकट असूनही भाजपपुढे त्यांचे चालले नव्हते. त्याच प्रमाणे नितीश निवडणुकीनंतर हतबल होतील अशी अपेक्षा केली जात आहे.

नितीशच्या पक्षाच्या 12 खासदारांवर मोदींच्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे भाजप नितीशना पायउतार करू शकत नाही असे सांगितले जात असले तरी गेल्या वर्षभरात चित्र अतिशय बदललेले आहे. भाजपने नितीश यांचा पक्ष पोखरून काढलेला आहे. नितीशची खासमखास समजली जाणारी माणसे देखील भाजपने फोडलेली आहेत. एकेकाळी नितीश यांचे उजवे हात असणारे एक नेते आर सी पी सिंग असेच भाजपच्या जवळ तीन वर्षांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचे राज्यसभेचे तिकीटच नितीशनी कापले होते. आता सिंग यांनी प्रशांत किशोर यांच्या पक्षात आपला पक्ष विलीन केला आहे आणि येनकेन प्रकारेण नितीशना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचे राजकारण त्यांनी सुरु केलेले आहे.

निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात ज्या प्रकारे भाजपने शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शंका उपस्थित करण्याचे राजकारण सुरु केलेले होते. तद्वतच बिहारमध्येदेखील केलेले आहे. येती निवडणूक रालोआ ही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार एव्हढेच भाजप म्हणत आहे. भाजपकडे बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तालेवार नेता नसला तरी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशी भावना पक्षात वाढत आहे. तात्पर्य काय तर मोदी-शहा यांना पसंद असा ‘होयबा’ बिहारमध्ये मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको. योगी आदित्यनाथ आणि फडणवीस सोडले तर भाजपचे बाकी सारे मुख्यमंत्री हे राजकीयदृष्ट्या काडी पहेलवान आहेत आणि श्रेष्ठींच्या कृपेवर आहेत हे आता फारसे गुपित राहिलेले नाही. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले हेमंत बिस्व शर्मा हे आसाममध्ये मुख्यमंत्री झाले खरे पण पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे आसन डळमळीत झाल्यासारखे दिसत आहे.

महाराष्ट्रात ज्याप्रकारे शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची कोंडी करण्याचे राजकारण भाजपने चालवले आहे तसेच ते बिहारच्या निवडणुकीनंतर नितीश आणि त्यांच्या पक्षाबाबत करतील असे बोलले जाते. नितीश यांना 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे शपथपूर्वक प्रशांत किशोर म्हणत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळी आहे, असे काही विरोधकदेखील मान्य करत आहेत. जर नितीशना कमी जागा मिळाल्या आणि भाजपच्या जागा वाढल्या तर नितीश यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये देखील नंबर एकचा पक्ष होण्याची भाजपची बऱ्याच काळापासून मनीषा आहे. येती निवडणूक ती किती प्रकारे आणि केव्हा सार्थ होईल त्याचे प्रतिबिंब दाखवणार आहे. प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष राज्यात तिसरा घटक म्हणून निवडणुकीत उदयास आलेला आहे. किशोर स्वत:च निवडणुकीत उमेदवार बनणे टाळून हे गूढ अजूनच वाढवलेले आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article