भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आसाम, जम्मू-काश्मीर
घरांमधून बाहेर धावून आले लोक
वृत्तसंस्था/ डोडा
जम्मू-काश्मीरच्या डोडा आणि आसामच्या उदलगुडीमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जम्मूमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 इतकी होती. तर आसाममध्ये ही तीव्रता 4.2 मॅग्नीट्यूड होती. डोडा जिल्ह्यात पहाटे 6.14 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचे केंद्र जमिनीत 15 किलोमीटर खोलवर होते. आतापर्यंत कुठल्याही जीवित किंवा आर्थिक हानीचे वृत्त समोर आले नाही. परंतु लोकांनी दहशतीत घरांबाहेर धाव घेतली होती असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जम्मू-काश्मीरच्या चिनाब खोरे क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवत असतात. डोडा, किश्तवाड, रामबन आणि रियासी जिल्ह्यांमध्ये मागील 5 वर्षांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे. काश्मीर खोरे भूकंपाच्या दृष्टीकोनातून संवेदनशील क्षेत्रात आहे. 8 ऑक्टोबर 2005 रोजी 7.6 तीव्रतेचा भूकंप जम्मू-काश्मीरमध्ये झाला होता. त्याचे केंद्र पीओकेतील शहर मुजफ्फराबादपासून 19 किलोमीटर अंतरावर होते. भूकंपामुळे उत्तर पाकिस्तान, उत्तर भारत आणि अफगाणिस्तानात नुकसान झाले होते. काश्मीर खोऱ्यातील 32,335 इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. जम्मू-काश्मीरमध्ये 1350 जणांना जीव गमवावा लागला होता. तर पीओकेत 7900 लोक मृत्युमुखी पडले होते.