असीम मुनीर पाकिस्तानचे पहिले ‘सीडीएफ’
पाकिस्तानच्या तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख पदही बहाल : शाहबाज सरकारकडून अधिसूचना जारी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान सरकारने असीम मुनीर यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (सीडीएफ) आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ (सीओएएस) म्हणून नियुक्ती केली. दोन्ही पदांवर त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी नियुक्तीला मान्यता दिली. मुनीर हे एकाच वेळी ‘सीडीएफ’ आणि ‘सीओएएस’ दोन्ही पदे भूषवणारे पहिले पाकिस्तानी लष्करी अधिकारी बनले आहेत. याव्यतिरिक्त एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू यांना दोन वर्षांची मुदतवाढ देखील मंजूर करण्यात आली. त्यांची ही मुदतवाढ मार्च 2026 मध्ये त्यांचा सध्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर लागू होईल.
12 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी संसदेने 27 वी घटनादुरुस्ती मंजूर करत लष्कराच्या अधिकारांमध्ये वाढ केली होती. याअंतर्गत, मुनीर यांना चीफ ऑफ स्टाफ (सीडीएफ) म्हणून नियुक्त करण्यात आले. हे पद स्वीकारल्यानंतर, त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचीही कमान स्वीकारल्यामुळे ते देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नियुक्तीची शिफारस करणारा प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठवला होता. यापूर्वी मुनीर यांना या वर्षाच्या सुरुवातीला फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली होती.
2022 मध्ये लष्करप्रमुख
जनरल असीम मुनीर यांची 29 नोव्हेंबर 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा मूळ तीन वर्षांचा कार्यकाळ 28 नोव्हेंबर 2025 रोजी संपला. त्यानंतर मुनीर यांची चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती करण्याची अधिसूचना 29 नोव्हेंबरपर्यंत जारी करण्यात येणार होती. तथापि, शाहबाज शरीफ यांनी असीम मुनीर यांच्या नियुक्तीच्या आदेशावर स्वाक्षरी करू नये म्हणून या प्रक्रियेतून स्वत:ला वेगळे केले होते. गेल्यावर्षी संसदेने लष्करप्रमुखांचा कार्यकाळ तीनवरून पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा कायदा मंजूर केला. त्यामुळे, त्यांचे पद कायदेशीररित्या धोक्यात नव्हते. गेल्या महिन्यात झालेल्या घटनादुरुस्तीने तिन्ही सशस्त्र दलांमध्ये समन्वय साधणाऱ्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (सीजेसीएससी) अध्यक्षपद बदलले. सीजेसीएससी शाहिद शमशाद मिर्झा 27 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले असले तरी असीम मुनीर यांना ‘सीडीएफ’ म्हणून नियुक्ती देण्यात आली नव्हती.