पाकिस्तानात आसिफा भुट्टो ठरणार प्रथम महिला
पत्नी नव्हे तर मुलीला राष्ट्रपतींनी दिला मान
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
आसिफा भुट्टो झरदारी या पाकिस्तानच्या प्रथम महिला असणार आहेत. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी स्वत:ची मुलगी आसिफाला प्रथम महिलेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतीनी प्रथम महिला म्हणून मुलीच्या नावाची घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे राष्ट्रपतींच्या पत्नीला प्रथम महिला संबोधिले जाते. अधिकृत घोषणेनंत आसिफा भुट्टो यांना प्रथम महिलेचे विशेषाधिकार प्रदान केले जाणार आहेत.
बेनझीर भुट्टो आणि आसिफ अली झरदारी याचा 18 डिसेंबर 1987 रोजी विवाह झाला होता. या दोघांनाही तीन अपत्य असून यात आसिफा सर्वात छोटी आहे. आसिफाचे ब्रिटनमध्ये शिक्षण झाले आहे. आसिफाची मोठी बहिण बख्तावर भुट्टोचा लंडनमधील व्यावसायिकासोबत विवाह झाला आहे. तर बंधू बिलावल हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष आहे. बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी एका जाहीर सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
आसिफामध्ये तिची आई आणि माजी पंतप्रधान बेनझीर यांची झलक दिसून येत असल्याचे लोकांचे मानणे आहे. तसेच तिच्या वक्तृत्वालाही मोठी पसंती मिळते. याचमुळे आसिफाला राजकारणात आणण्याची इच्छा आसिफ अली झरदारी यांची आहे. नॅशनल असेंबलीसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत बिलावल यांच्या शहदकोट मतदारसंघात आसिफा उमेदवार असू शकते.
बिलावल यांनी शहदकोटसोबत लरकाना मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. बिलावल हे दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यामुळे त्यांना एक मतदारसंघ सोडावा लागणार ओत. बिलावल हे लरकानाचे प्रतिनिधित्व कायम ठेवत शहदकोटमध्ये बहिण आसिफाला उमेदवारी देणार असल्याचे मानले जात आहे.