असिफ अली झरदारी पाकिस्तानचे 14 वे राष्ट्रपती
इम्रान समर्थित उमेदवाराचा दारूण पराभव
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सह-अध्यक्ष असिफ अली झरदारी यांना शनिवारी पाकिस्तानच्या 14 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्यांदा देशाचे सर्वोच्च पद भूषवणारे झरदारी हे यापूर्वी 2008 ते 2013 या काळात राष्ट्रपती होते. झरदारी हे पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांची जागा घेणारे झरदारी रविवारी शपथ घेऊ शकतात.
पाकिस्तानच्या राज्यघटनेतील तरतुदींनुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नॅशनल असेंब्ली आणि चार प्रांतीय असेंब्लीचे नवनिर्वाचित सदस्य मतदान करतात. पीपीपी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे संयुक्त उमेदवार 68 वषीय झरदारी यांना नॅशनल असेंब्ली आणि सिनेटमध्ये 255 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे 75 वषीय महमूद खान अचकझाई यांना 119 मते मिळाली. सिंध विधानसभेत झरदारी यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांचा पक्ष पीपीपी सिंधमध्ये सत्तेवर आहे. बलुचिस्तान विधानसभेतही झरदारींना सर्वाधिक मते मिळाली. तसेच पंजाब विधानसभेतही त्यांनी अचकझाई यांना पिछाडीवर टाकले. खैबर पख्तुनख्वा विधानसभेत अचकझाई यांना झरदारींपेक्षा जास्त मते मिळाली. सुन्नी इत्तेहाद परिषदेचे उमेदवार अचकझाई हे पश्तूनख्वा मिल्ली अवामी पार्टीचे (पीकेएमपी) प्रमुख आहेत. त्यांना तुऊंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) पाठिंबा दिला होता.