आशियाई स्क्वॅश दुहेरी चॅम्पियनशिप, भारताला तीन अजिंक्यपदे
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
येथे झालेल्या दुसऱ्या आशियाई स्क्वॅश दुहेरी चॅम्पियनशिपमध्ये भारताने पुरुष, महिला व मिश्र या तिन्ही प्रकारात जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. अग्रमानांकित भारतीय जोडी अभय सिंग व वेलावन सेंथिलकुमार यांनी पुरुष दुहेरीत पहिला गेम गमविला. पण जोरदार मुसंडी मारत पाकच्या नूर झमान व नासिर इक्बाल यांच्यावर 2-1 (9-11, 11-5, 11-5) अशी मात करीत जेतेपद पटकावले. 88 मिनिटे हा सामना चालला होता. त्याआधी भारतीय जोडीने हाँगकाँगच्या चि हिम वाँग व मिंग हाँग टँग यांचा उपांत्य फेरीत पराभव केला होता.
महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित जोश्ना चिन्नप्पा व अनाहत सिंग यांनी एका सेटची पिछाडी भरून काढत मलेशियाच्या आयना अमानी व झिन यिंग यी यांच्यावर 35 मिनिटांत 8-11, 11-9, 11-10 अशी मात केली. त्याआधी उपांत्य फेरीत जोश्ना-अनाहत यांनी हाँगकाँगच्या पो युइ किर्स्टी वाँग व यी लाम टोबी त्से यांना हरविले होते.
मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत अग्रमानांकित अभय सिंग व अनाहत सिंग यांनी जेतेपद मिळवित भारतासाठी क्लीन स्वीप यश मिळवून दिले. अंतिम फेरीत या जोडीने मलेशियाच्या रॅचेल अर्नोल्ड अमीशेनराज चंदरन यांच्यावर केवळ 28 मिनिटांत 11-9, 11-7 अशी मात केली. असे करताना अभय-अनाहत यांनी या स्पर्धेतील दुसरे जेतेपद मिळविले. उपांत्य फेरीत त्यांनी मलेशियाच्याच आयना अमानी व शफिक कमाल यांचा पराभव केला होता.