एशियन पेंट्सने कमावला 1475 कोटी रुपयांचा नफा
नवी दिल्ली : रंग उत्पादनात आघाडीवर असणारी कंपनी एशियन पेंट्सने डिसेंबरअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून या अंतर्गत कंपनीच्या नफ्यामध्ये 34 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली असल्याचे समजते. 1475 कोटी रुपये नफ्याच्या रुपात कंपनीच्या खात्यात जमा झाले आहेत. कंपनीने यासंदर्भातली माहिती गुरुवारी शेअरबाजाराला दिली आहे.
नफ्यामध्ये लक्षणीय कामगिरी
एशियन पेंट्स कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील तिमाहीमध्ये 1475 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीने 1097 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता.
इतका आला खर्च
कंपनीचा खर्च डिसेंबरला संपलेल्या तिमाहित काहीसा वाढलेला असून तो 7321 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याच दरम्यान कंपनीने 9103 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. एक वर्षापूर्वी याच अवधीमध्ये कंपनीने 8636 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.