आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ निंगबो (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप सांघिक स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत असून भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि इतर स्पर्धकांना ही स्पर्धा कठीण आव्हान म्हणून राहील. या स्पर्धेतून भारताची दुहेरीची टॉपसिडेड जोडी आणि विद्यमान विजेती सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. सदर स्पर्धा ही आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठीची शेवटची पात्रता स्पर्धा असून बॅडमिंटनपटूंना मानांकन गुण मिळविण्यासाठी झगडावे लागेल.
महिला एकेरीत भारताची पी. व्ही. सिंधू हिला या स्पर्धेत जगातील कांही अव्वल बॅडमिंटनपटूंविरोधात विजयासाठी संघर्ष करावा लागेल. सिंधूने आतापर्यंत दोन वेळेला ऑलिम्पिक पदके मिळविली आहेत. त्यानंतर गेल्यावर्षीच्या बॅडमिंटन हंगामात तसेच चालू वर्षीच्या हंगामातही समाधानकारक कामगिरी तिला करता आली नाही. फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती चेन युफेईकडून हार पत्करावी लागली होती तर स्पेन मास्टर्स स्पर्धेत तिला थायलंडच्या के. सुपिंदाकडून पराभव पत्करावा लागला होता. सिंधूने गेल्या महिनाभराच्या कालावधीत आपल्या सरावावर अधिक भर दिला असून तिची चीनमधील या स्पर्धेत सत्त्वपरीक्षा ठरणार आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला एकेरीत टॉपसिडेड अॅन सेयांग, ऑलिम्पिक चॅम्पियन चेन युफेई, तेई यांग, यामागुची व बिंगजेओ हे अव्वल स्पर्धक सहभागी होत आहेत. सिंधूचा सलामीचा सामना मलेशियाच्या वेई बरोबर होणार आहे. सिंधूने आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत वेईचा चार वेळेला पराभव केला असून एकदा मात्र तिला हार पत्करावी लागली आहे. महिला एकेरीत भारताच्या आकर्षि काश्यपचा सलामीचा सामना थायलंडच्या बुसानेनशी होणार आहे.
पुरूष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेनला तसेच किदांबी श्रीकांतला व एच. एस. प्रणॉयला विजयासाठी दर्जेदार कामगिरी करावी लागेल. लक्ष्य सेनने यापूर्वी फ्रेंच खुल्या तसेच अखिल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यफेरी गाठत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. प्रणॉयचा सलामीचा सामना चीनच्या लु झु बरोबर होणार आहे. किदांबी श्रीकांतची सलामीची लढत तृतीय मानांकीत अँथोनी गिनटींगशी होईल. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या गैरहजेरीत या स्पर्धेत एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरूष दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. तनिषा क्रेस्टो व अश्विनी पोन्नाप्पा यांचा सलामीचा सामना इंडोनेशियाच्या कुसुमा व अमेलिया कॅहेया यांच्याबरोबर होणार आहे. तसेच ट्रेसा जॉली व गायित्री गोपीचंद यांचा सलामीचा सामना चीनच्या शियु आणि निंग यांच्याबरोबर होईल.