आशियाई अॅथलेटिक्स : गुलवीरला सुवर्ण, सेबॅस्तियनला कांस्य
वृत्तसंस्था/ गुमी (दक्षिण कोरिया)
राष्ट्रीय विक्रमधारक गुलवीर सिंगने मंगळवारी येथे आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुऊषांच्या 10,000 मीटर शर्यतीत अव्वल स्थान मिळवून भारताचे सुवर्णपदकाच्या बाबतीत खाते उघडले. आशियाई खेळांतील या 26 वर्षीय कांस्यपदक विजेत्याने 28 मिनिटे 38.63 सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. याआधी यावर्षी त्याने राष्ट्रीय विक्रम करताना 27:00.22 अशी वेळ दिली होती. जपानच्या मेबुकी सुझुकीने (28:43.84) रौप्यपदक, तर बाहरीनच्या अल्बर्ट किबिची रोपने (28:46.82) कांस्यपदक जिंकले.
त्याआधी सर्विन सेबॅस्तियनने पुऊषांच्या 20 किलोमीटर रेस वॉक स्पर्धेत 1 तास 21 मिनिटे आणि 13.60 सेकंद अशी वेळ नोंदवून कांस्यपदक मिळवत भारताचे खाते उघडले. चीनचा वांग झाओझाओ (1:20:36.90) आणि जपानचा केंटो योशिकावा (1:20:44.90) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. सेबॅस्तियनने फेब्रुवारीमध्ये झालेल्या उत्तराखंडमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना 1 तास 21 मिनिटे व 23 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदविली होती. त्यापेक्षा ही वेळ थोडीशी कमी राहिली. या शर्यतीतील दुसरा भारतीय अमित 1:22:14.30 वेळेसह पाचव्या स्थानावर राहिला.
भारताने या स्पर्धेत 58 जणांचा संघ पाठवला आहे. या स्पर्धेत देशाने मागील आवृत्तीत 27 पदके जिंकली होती. आशियाई खेळांतील विजेती अन्नूचा भालाफेकीत सर्वोत्तम प्रयत्न हा 58.30 मीटरचा राहिला. मात्र तिला पदक मिळवता आले नाही. हा तिचा तिसरा प्रयत्न होता. चीनच्या सु लिंगदानने 63.92 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले, तर जपानी जोडी साई ताकेमोटो (58.94 मीटर) आणि मोमोने उएदा (58.60 मीटर) यांनी उर्वरित पदके जिंकली. अन्नूची 63.82 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी हा महिलांच्या भालाफेकीतील भारतीय राष्ट्रीय विक्रम आहे.
याशिवाय युनूस शाहने पुऊषांच्या 1500 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत प्रवेश करताना 3:46.96 मिनिटांच्या वेळेसह पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवले. अजय कुमार सरोजने दोन वर्षांपूर्वी बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत याच शर्यतीत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. सर्वेश अनिल कुशारेनेही पात्रता फेरीत 2.10 मीटर उडीसह संयुक्तपणे चौथे स्थान मिळवत पुऊषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.