For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश युवा संघाकडे आशिया चषक

06:55 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश युवा संघाकडे आशिया चषक
Advertisement

आशिप़ुर रेहमान शिबलीला दुहेरी मुकुट : युएई उपविजेता

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

19 वर्षाखालील वयोगटाच्या येथे झालेल्या आशियाई क्रिकेट मंडळाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद बांगलादेशने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशने संयुक्त अरब अमिरातचा (युएई) 195 धावांनी दणदणीत पराभव केला. बांगलादेशचा सलामीचा फलंदाज आशिकुर रेहमान शिबली याला मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी मुकुट मिळाला.

Advertisement

या अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 282 धावा जमविल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातचा डाव केवळ 24.5 षटकात 87 धावात आटोपला. हा अंतिम सामना बांगलादेशने एकतर्फीच जिंकला.

बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या शिबलीने 149 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 129, सी. रिझवानने 71 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 60, अरिफूल इस्लामने 40 चेंडूत 6 चौकारांसह 50, कर्णधार महफिजूर रेहमान रब्बीने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. शिबली आणि सी. मोहम्मद रिझवान यांनी दुसऱ्या गड्यासाठी 125 धावांची भागिदारी केली. रिझवान बाद झाल्यानंतर शिबलीने अरिफूल इस्लामसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 86 धावांची भर घातली. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. संयुक्त अरब अमिराततर्फे आयमन अहमदने 52 धावात 4 तर ओमीझ रेहमानने 41 धावात 2 तसेच हार्दिक पै व ध्रुव पराशर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर संयुक्त अरब अमिरातचा डाव 24.5 षटकात 87 धावात आटोपला. अरब अमिरातच्या केवळ दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ध्रुव पराशरने 40 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 25 धावा केल्या. सलामीच्या अक्षत रायने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. अमिरातच्या डावात 14 अवांतर धावा मिळाल्या. बांगलादेशतर्फे मारुफ मृधा आणि बोरसन यांनी प्रत्येकी 3 तर इक्बाल हुसेन इमॉन व जिबॉन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. संयुक्त अरब अमिरातच्या डावामध्ये 9 चौकार नोंदविले गेले.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकात 8 बाद 282 (शिबली 129, सी. मोहम्मद रिझवान 60, अरिफूल इस्लाम 50, रबी 21, आयमन अहमद 4-52, ओमिद रेहमान 2-41, हार्दिक पै 1-50), संयुक्त अरब अमिरात 24.5 षटकात सर्व बाद 87 (अक्षत राय 11, ध्रुव पराशर नाबाद 25, अवांतर 14, मारुफ मृधा 3-29, बोरसन 3-26, इमॉन 2-15, जिबॉन 2-7).

Advertisement
Tags :

.