आशिया चषक हॉकी स्पर्धा राजगिरमध्ये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद बिहार राज्यातील ऐतिहासिक शहर राजगीर भूषविणार आहे. 2026 साली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी राजगीरमधील ही स्पर्धा पात्र फेरीची म्हणून ओळखली जाईल. 2026 ची पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँड यांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे.
बिहार राज्यातील राजगीर हे शहर ऐतिहासिक म्हणून ओळखले जाते. या शहरामध्ये यापूर्वी महिलांची आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात आली होती. आशिया चषक हॉकी स्पर्धेतील विजेत्या संघाला 2026 च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाईल. राजगीरमधील होणारी ही बारावी आशिया चषक हॉकी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांचा समावेश राहिल.
या स्पर्धेत यजमान भारत, पाकिस्तान, जपान, कोरिया, चीन आणि मलेशिया यांचा सहभाग आहे तर विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी आशियाई चषक स्पर्धेतील उर्वरित दोन संघांना पात्रतेची संधी राहिल. हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा मंडळ यांच्यात पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या यजमानपदासाठी सोमवारी लेखी करार करण्यात आला आहे. आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत द. कोरियाचा संघ सर्वात यशस्वी म्हणून ओळखला जातो. द. कोरियाच्या हॉकी संघाने आतापर्यंत म्हणजे 1994, 1999, 2009, 2013 आणि 2022 साली असे पाचवेळा अजिंक्यपद मिळविले आहे. भारताने 2003, 2007 आणि 2017 साली असे तीनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पाकने 1982, 1985 आणि 1989 साली अशी चारवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. राजगीरमधील ही आगामी स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी केली जाईल, अशी ग्वाही हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी दिले आहे.