‘आयपीएल’ लिलावात ‘राईट टू मॅच’वर अश्विनने उठविला सवाल
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने दि राईट टू मॅच (आरटीएम) च्या नियमावर प्रश्न उपस्थित केला आहे. हा नियम इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामासाठीच्या मेगा लिलावामध्ये लागू होईल अशी चर्चा चालली आहे. या महिन्याच्या सुऊवातीला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाबद्दल बीसीसीआय मुख्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाली होती. ‘आरटीएम’ नियम पुन्हा लागू करणे हा त्या चर्चेचा एक मुद्दा होता, असे वृत्त झळकले होते.
‘आरटीएम’ हा एक असा नियम आहे ज्याद्वारे संघांना फ्रँचायझीने लावलेल्या सर्वोच्च बोलीशी जुळल्यास मागील हंगामात त्यांचे प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू आपोआप मिळू शकतो. हा नियम पहिल्यांदा 2014 मध्ये लागू करण्यात आला होता आणि 2018 पासून आयपीएल लिलावामध्ये वापरला गेलेला नाही. रिटेन्शन नियम आणि ‘आरटीएम’च्या वापराबाबत चर्चा चाललेली असताना अश्विन मात्र किमान सध्याच्या स्वरूपात तरी आरटीएम लागू करण्याच्या बाजूने नाही.
‘जर एखाद्या फ्रँचायझीने एखाद्या खेळाडूला तो त्यांच्या पहिल्या चार किंवा पाच खेळाडूंमध्ये झळकताना न दिसल्यामुळे त्याला सोडले असेल, तर त्यांना लिलावादरम्यान त्याच्यासाठी उडी मारण्याचा अधिकार कसा काय मिळतो ? तुम्ही खेळाडूला हा पर्याय द्या, ‘राईट टू मॅच’ हवे का हे त्याला विचारा’, असे मत अश्विनने कृष्णम्माच्यारी श्रीकांतचा यूट्युब शो ‘चिकी चीका’मध्ये बोलताना व्यक्त केले. ‘दोन्ही बाजूंना बंधनकारक असलेला करार असावा. त्यात असे म्हटले जायला हवे की, जर किंमत ठरावीक रकमेत असेल, तर खेळाडूच्या बाबतीत ‘आरटीएम’चा उपयोग केला जाऊ शकतो आणि ती पूर्वनिर्धारित रक्कम ठरविण्याचे काम खेळाडूवर सोडायला हवे, असे त्याने सांगितले. अश्विनने ‘आरटीएम’ नियमाबद्दल चिंता व्यक्त करण्याची ही पहिलीच घटना नाही. या महिन्याच्या सुऊवातीला आपल्या यूट्युब चॅनलवर बोलताना या अनुभवी फिरकीपटूने असा दावा केला होता की, ‘आरटीएम’पेक्षा जास्त अन्यायकारक असा कोणताही नियम नाही.