अश्विन-कुलदीपने साहेबांना 145 धावांवर गुंडाळले
अश्विनचे 5 तर कुलदीपचे 4 बळी : भारताला विजयासाठी 152 धावांची गरज
वृत्तसंस्था/ रांची
रांची कसोटीत दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाने ध्रुव जुरेल, आर अश्विन व कुलदीप यादवच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बाजी पलटली आहे. तिसऱ्या दिवशी फिरकीपटू आर अश्विन व कुलदीप यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला व टीम इंडियाला विजयासाठी 192 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने तिसऱ्या दिवसअखेरीस 8 षटकांत बिनबाद 40 धावा केल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी अजून 152 धावाची गरज असून रोहित शर्मा 24 व यशस्वी जैस्वाल 15 धावांवर खेळत आहेत.
तत्पूर्वी, भारताने 7 बाद 219 धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. ध्रुव जुरेल व कुलदीप यादव या दोघांनी आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. इंग्लंडचा संघ यावेळी कुलदीपला जास्त टार्गेट करत असल्याचे पाहायला मिळाले. कारण ते कुलदीपला जास्त चेंडू खेळवायला लावत होता. पण इंग्लंडची ही रणनिती कुलदीपने हाणून पाडली. पण अखेर जेम्स अँडरसनने त्याला बाद केले, पण कुलदीपने आपले काम चोख बजावल्याचे पाहायला मिळाले. कुलदीपने यावेळी तब्बल 131 चेंडूत 28 धावा केल्या. यानंतर जुरेलने मात्र संयमी खेळी साकारताना संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. जुरेलने 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 90 धावा केल्या. कारकिर्दीतील पहिल्यावाहिल्या शतकापासून मात्र तो दूर राहिला. जुरेलला 90 धावांवर हार्टलीने बाद केले. जुरेल बाद झाल्यानंतर भारताचा दुसरा डाव 103.2 षटकांत 307 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून शोएब बशीरने 5 तर हार्टलीने 3 गडी बाद केले.
अश्विन-कुलदीपसमोर साहेबांचे लोटांगण
पहिल्या डावात अवघ्या 46 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लिश संघाची सुरुवात मात्र खराब झाली. भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात फिरकी गोलंदाजीच्या मदतीने केली. रोहित शर्माने यावेळी आर. अश्विनला पहिले षटक दिले. अश्विनने यावेळी रोहितला निराश केले नाही. अश्विनने पाचव्या षटकात इंग्लंडला एकामागून एक धक्के दिले. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अश्विनने सलामीवीर बेन डकेटला माघारी धाडले. डकेटला 15 धावा करता आल्या. त्यानंतरच्या चेंडूवरच ऑली पोपला माघारी धाडले. पोपला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर अश्विनला हॅट्ट्रिकची संधी होती, पण त्याला ती मिळवता आली नाही.
पहिल्या डावातील शतकवीर जो रुट 11 धावा काढून माघारी परतला. बेअरस्टोने 30 धावांचे योगदान दिले. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स 4 धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. तर बेन फॉक्सने 17 धावा केल्या. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. सलामीवीर झॅक क्रॉलीने सर्वाधिक 7 चौकारासह 60 धावा केल्या. त्याला कुलदीपने बाद केले. यानंतर तळाच्या फलंदाजांनही केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 53.5 षटकांत 145 धावांत संपुष्टात आला. रांचीच्या या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर अश्विनने 51 धावांत 5 बळी मिळवले. कुलदीप यादवने एकामागून एक इंग्लंडला धक्के देताना 22 धावांत 4 गडी बाद केले. जडेजाला 1 बळी घेता आला.
टीम इंडियाच्या बिनबाद 40 धावा
भारताने 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर 8 षटकात बिनबाद 40 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 24 आणि यशस्वी जैस्वाल 16 धावांवर नाबाद आहेत. आता भारताला विजयासाठी चौथ्या दिवशी आणखी 152 धावा करायच्या आहेत. अर्थात, रांचीच्या या विकेटवर चौथ्या दिवशी भारताचा देखील कस लागणार आहे, हे मात्र निश्चित.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव 353 व दुसरा डाव 145 (झॅक क्रॉली 60, बेअरस्टो 30, बेन डकेट 15, बेन फोक्स 17, अश्विन 51 धावांत 5 बळी, कुलदीप यादव 22 धावांत 4 बळी).
भारत पहिला डाव 307 व दुसरा डाव बिनबाद 40 धावा (रोहित शर्मा खेळत आहे 24, यशस्वी जैस्वाल खेळत आहे 16).
अनिल कुंबळेचा विक्रम मोडत अश्विनने रचला इतिहास
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा अव्वल दर्जाचा फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. या यादीत त्याने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत अश्विनने पाच बळी मिळवत महान फिरकीपटू अनिल कुंबळेचा विक्रम मोडित काढला आहे. सध्याच्या घडीला अश्विन हा भारतीय भूमीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. कुंबळे यांच्या नावे 350 बळी होते. पण, रांची कसोटीत अश्विनने हा विक्रम मोडला आहे. त्याच्या खात्यावर आता 352 बळी आहेत.
भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज
- रविचंद्रन अश्विन - 352 बळी
- अनिल कुंबळे - 350 बळी
- हरभजन सिंग - 265 बळी
- कपिल देव - 219 बळी
- रवींद्र जडेजा - 210 बळी
नवखा ध्रुव ‘ताऱ्यासारखा’ चमकला
रांचीमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी या युवा फलंदाजाने पहिल्या डावात एकट्याने सामन्याचं चित्रच बदलून टाकले. ध्रुव जुरेलने 91 धावांची दमदार खेळी करत इंग्लंडच्या मोठ्या आघाडीच्या आशा धुळीस मिळवल्या. भारतीय संघाला पहिला डाव 307 धावांपर्यंत मर्यादित राहिला आणि ध्रुवच्या खेळीमुळे इंग्लंडला केवळ 46 धावांची आघाडी घेता आली. विशेष म्हणजे, पहिल्या डावात टीम इंडियाच्या घसरण सुरू असताना ध्रुव जुरेलने शानदार अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर लष्करी शैलीत सलामी देत सेलिब्रेशन केले आहे. त्याने ही खेळी आपल्या वडिलांना समर्पित केली आहे. जुरेलचे वडील निवृत्त लष्करी जवान आहेत, त्यांनी कारगिल युद्धातही योगदान दिले होते. आपल्या मुलाने एनडीएची परीक्षा द्यावी आणि लष्करात अधिकारी होऊन देशाची सेवा करावी, अशी जुरेलच्या वडिलांची इच्छा होती. दरम्यान आठवीत असताना जुरेल क्रिकेटशी जोडला गेला. यानंतर त्याच्या वडिलांनी क्रिकेटपटू होण्यासाठी त्याला पाठिंबा दिला. दरम्यान, रांची कसोटीत आपले पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने एक कडक सॅल्यूट दिला.