आयसीसीच्या कसोटी संघामध्ये अश्विन, जडेजाला स्थान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या 2023 सालातील आयसीसीच्या पुरूषांच्या कसोटी संघामध्ये भारताचे फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीचा 2023 सालातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वॉजा, लंकेचा दिमुथ करुणारत्ने, न्यूझीलंडचा केन विल्यमसन, इंग्लंडचा जो रुट, ऑस्ट्रेलियाचे ट्रेव्हिस हेड आणि अॅलेक्स कॅरे यांचा समावेश आहे. भारताच्या रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांना या संघात स्थान देण्यात आले आहे.
बॉर्डर-गावस्कर चषकासाठीच्या झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताच्या रविचंद्रन अश्विनने 25 गडी बाद केले. या मालिकेतील पहिल्याच कसोटीत अश्विनने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावातही 7 गडी बाद केले. तसेच त्यांनी फलंदाजीतही उपयुक्त धावा घेतल्या. या सामन्यात अश्विनने 131 धावात 12 बळी मिळविले. त्यानंतर विंडीज विरुद्धच्या सामन्यात अश्विनने फलंदाजीत अर्धशतक झळकविले तर गोलंदाजीत त्याने 3 बळी मिळविले.
भारतीय संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजाला 2023 चा क्रिकेट हंगाम निश्चितच समाधानकारक गेला. नागपूर येथे झालेल्या सामन्यात जडेजाने फलंदाजीत अर्धशतक झळकवले तर गोलंदाजीत त्याने 5 गडी बाद केले. भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात अश्विनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.