अशोक चव्हाण यांच्या राजीनामास्त्राने जिह्यात संशयाचे धुके!
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू शकणाऱ्या नेत्यांची सोशल मिडीयावर चर्चा; जिह्यातील राजकारणातही सरमिसळ शक्य
कोल्हापूर : संतोष पाटील
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीमाना देत, संपूर्ण राज्याचे राजकारण हालवून टाकले. अशोक चव्हाण यांच्या राजीनामास्त्राने कोल्हापूर जिह्यात मात्र संशयाचे राजकीय धुके दाट झाले आहे. कोल्हापूर-सांगली जिह्यातील काँग्रेस नेत्यांनी आम्ही नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला असला तरी आजचे मरण उद्यावर नाही ना..! असे सुचक बोल समाजमाध्यमांवर उमठत आहेत. चव्हाण यांच्या पावलावर पाऊल नव्हे, तर आम्ही राहुल बिग्रेडचे सैनिक आहोत, हे कृतीतून दाखवून देण्याचे आव्हान काँग्रेसच्या कथित संशयित नेत्यांवर आहे.
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त कोल्हापुरात सोमवारी दुपारी वाऱ्यासारखे पसरले. याचे प्रतिध्वनी समाजमाध्यमांवर तत्काळ उमठू लागले. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस का सोडली ते पुढे काय करणार ? याप्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक होते. मात्र, चव्हाण यांचे पुढे काय ? यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापुरातून त्यांच्या सोबत कोण-कोण जाणार याची विचारणा करणारे मेसेज धडाधड व्हायरल होवू लागले. चव्हाण यांच्या सोबत अमूक नेता जाणार असून तो का जाणार याचा तपशीलवार वृत्तांत गावांगावात कानावर पडू लागला. ही कूजबूज जशी कोल्हापुरात होती तशीच सांगली जिह्यातही होती अन् संपूर्ण महाराष्ट्रात संभाव्य नेत्यांची नावे समाजमाध्यंमावर फिरू लागली होती. याचा जो परिणाम व्हायचा तोच झाला, काँग्रेसचे नेते धडाधड व्हिडीओ आणि प्रसारमाध्यमांसमोर येवून खुलासा करु लागले.
भाजपसोबत काँग्रेसचे काही नेते जाणार असल्याची चर्चा मागील दीड वर्षापासून होती. शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे काही नेते उशीरा पोहचले. यामध्ये प्रामुख्याने अशोक चव्हाण हे होते. मुंबईतील ट्रॅफिकमुळे उशीर झाल्याचा खुलासा आला. हा सरकार पडल्यानंतर विश्वासदर्शक ठराव होता म्हणून ट्रॅफिकच्या कारणाने उशीर झाला. मात्र, हाच जर मंत्री मंडळाचा शपथविधी सोहळा असता तर हे नेते रात्रीच मंत्रालयाच्या पायरीवर येवून बसले नसते काय ? असा सवालही त्यावेळी उपस्थित झाला. अशोक चव्हाण यांच्याबद्दल जी काही चर्चा होती ती खरी ठरल्याने त्यांच्या मागून जिह्यातील आणि महाराष्ट्रातील कोण-कोण जाणार या चर्चेला महत्व आले होते. त्यामुळेच राज्यभरातील काँग्रेसच्या नेत्यांनी धडाधड खुलासा करुन आपले आताचे पत्ते खेळले. मात्र, हे नेते काँग्रेसला सोडून जाणार नाहीत ? असे छातीठोकून एकही कार्यकर्ता सांगण्यास तयार नाही, हेच खरे गुपीत अशोक चव्हाण यांच्या जाण्यामागे असल्याने खरेच काँग्रेसमध्ये थांबू इच्छिण्राया नेत्यांची गोची करणार आहे.
काँग्रेससोबतच राहणार असल्याचे या नेत्यांनी आज जरी जाहीर केले असले तरी तितक्याच जोमाने नव्हे तर अधिक ताकदीने आता मैदानात उतरावे लागणार आहे. अन्य कारणाने या नेत्यांची राजकीय तळमळ कमी झाल्याचे दिसली तरी अस्सल कोल्हापुरी भाषेत ‘अरं यांनीपण पाव खाल्ला वाटतं...‘ अशा शेलक्या शब्दातील बोल कानावर पडू शकतात. कोल्हापूर हे राजकीयदृष्ट्या खूपच संवेदनशील आहे, इथे निवडून आणण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदानाची परंपरा आहे. त्यामुळे यापुढे नेत्यांना सावध मात्र आक्रमकपणे राजकीय खेळी करावी लागणार आहे. भलेही या नेत्यांच्या मनात अजूनही काँग्रेसबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नसेल, किंवा पक्ष सोडण्याचा विचारही मनात आलेला नसेल, मात्र चव्हाण यांच्या जाण्यामुळे नेत्यांच्या पक्षप्रेमाची मनिषा आता कृतीतून दाखवावी लागणार आहे. यासाठी येवू घातलेल्या निवडणुकांत प्रचाराचा तोच जोष आणि त्वेष दाखवून देत, नसनसांत काँग्रेसच हे दाखवून देण्याचे कठिण आव्हान जिह्यातील काँग्रेस नेत्यांपुढे असेल.
सतेज पाटील-पी.एन. यांचे पक्षीय महत्व वाढणार
आमदार पी.एन. पाटील यांचे काँग्रेसप्रेम महाराष्ट्राला परिचित आहे. सतेज पाटील यांनी आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी केलेल्या रणनितीने भाजपचा पराभव होवू शकतो, हे निवडणुकीत दाखवून दिले. प्रचार तंत्र, सहयोगी पक्षाच्या राज्याच्या नेतृत्वासह जिह्यातील नेत्यांशी समन्वय, जलद हालचाली करुन विरोधकांना मात देण्यासाठी आक्रमक हालचाली, विरोधकांनी उचलेला प्रचाराचा मुद्दा नाकाम करण्यासह आपला अजेंडा पुढे रेटण्यात भाजप प्रमाणेच सतेज पाटील यांची रणनिती यशस्वी ठरणारी होती. परफेक्ट नियोजन करुन करेक्ट कार्यक्रम करण्यात हातखंडा असलेल्या सतेज पाटील यांना घेरण्याची रणनिती पुढील काळात भाजपच्या थिंकटँकडून होणार आहे. पी.एन. पाटील यांचा कट्टर काँग्रेसीपणा आणि 2018 पासून सलग नऊ निवडणुकांत अपराजित राहत, अजात शत्रू ठरलेल्या सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचे कस लावणारी तसेच काँग्रेस पक्षांतर्गत वजन वाढवण्राया येत्या काळातील निवडणुकात असतील.
चौकट बदलली..!
जिह्याच्या राजकारणाची चौकट महाविकास आघाडीच्या प्रयोगाने बदलली होती. शिवसेनेच्या बंडखोरीने त्याला मोठे खिंडार पडले. ना. अजित पवार यांनी सवतासुभा मांडल्याने महाविकासचा पायाच ठिसूळ झाला. याचे पडसाद कोल्हापुरातही उमठले. आता अशोक चव्हाण यांच्या सोडचिट्टीने काँग्रेस नेते फ्रंटवर आले आहेत. जिह्यात सर्वपक्षीय नेत्यांचा पक्षीय परिघाबाहेर याराना सर्वश्रृत आहे. यामुळे सगळे एकाच माळेचे मणी असल्याची भावना कोल्हापूरकरांत आहे. परस्पर विरोधात नेते भूमीका घेणार नसल्याचे चित्र असल्याने महाविकासचा गड भक्कम कसा होणार याची शाशंकता कार्यकर्त्यांत आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप आक्रमक आणि सकारात्मक झाली आहे. विरोधी आघाडीच्या फाटाफुटीने भाजपला पॉलिटिकल बुस्ट मिळाला असून यावातावरणात कोल्हापूरचा गड जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजप-शिंदे आणि अजित पवार गटाच्या आक्रमक प्रचारापुढे आता काँग्रेसला रणनिती ठरवावी लागेल.