अशोक चव्हाणांच्या निर्णयानंतर जिल्ह्यात अफवांना पीक! काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही : आ. विक्रमदादा सावंत
जत, प्रतिनिधी
महाराष्ट्रात सोमवार दिनांक 12 रोजी प्रदेश काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडीनंतर राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली. यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली. राज्यातील 15 ते 16 काँग्रेस आमदार भाजप किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा जोरदार उठल्या. यात सांगली काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्याही नावाची चर्चा पुढे आली. त्या पाठोपाठ जिल्ह्यात विश्वजीत कदम यांचे सख्खे मावस बंधू तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जत विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार विक्रम सिंह सावंत हे देखील पक्ष बदलू शकतात अशी जोरदार चर्चा जिल्हाभर सुरू झाली होती.
या संदर्भात तरुण भारत संवाद शी बोलताना आ. विक्रम दादा सावंत म्हणाले, मी आज दिवसभर मतदारसंघात विविध ठिकाणी विकास कामांची उद्घाघटने करत आहे. लोकांशी संवाद साधतोय. ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांची बातमी कळल्यानंतर मला ही वेदना झाल्या. परंतु हे अचानक कसे घडले याबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे त्या विषयावर जास्त काही बोलू इच्छित नाही.
परंतु आपण मात्र काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. ज्या काही चर्चा सुरु आहेत, त्यावर कार्यकर्त्यांनी, जनतेने विश्वास ठेवू नये. 2019 मध्ये मोदी लाटेतही मला काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि तालुक्याच्या विकासासाठी जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्याशी प्रतारणा होणार नाही. आज राज्यात ज्या काही काँग्रेसमध्ये घडामोडी घडत आहेत, त्याबाबतीत मी कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, असेही आ. विक्रम सावंत यांनी स्पष्ट केले.
वाढदिवसाचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत
चार फेब्रुवारी रोजी आ. विक्रम सावंत यांचा वाढदिवस मोठ्या शक्ती प्रदर्शनासह येथे साजरा झाला होता. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा आत्ताच मला शुभेच्छांसाठी फोन आला होता. त्यांच्याकडे तालुक्याच्या विकासाचे काही प्रश्न मांडले. यावर त्यांनी तातडीने ती कामे पूर्ण करण्याचे अभिवचन दिल्याचे उपस्थित जनसमुदायाला जाहीरपणे सांगितले. आ. विक्रम सावंत यांचे हे विधान आणि आज घडलेल्या घटना याची पुन्हा एकदा जोरदार चर्चा जत मतदार संघात सुरू झाली होती. पण तरुण भारत संवाद ने त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मात्र आ. सावंत यांनी आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही असे सांगत, या साऱ्या घडामोडीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.