लखीमपूर खीरी प्रकरणी आशीष मिश्राला जामीन
माजी केंद्रीय मंत्र्यांचा पुत्र : सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लखीमपूर खीरी हिंसाप्रकरणी तुरुंगात कैद माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष मिश्राला जामीन मिळाला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाला लखीमपूर खीरी हिंसा प्रकरणी सुनावणी गतिमान करण्याचा आणि कालावधी निश्चित करण्याचा निर्देश दिला आहे.
लखीमपूर खीरीच्या तिकुनियामध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये हिंसा भडकली होती. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा मिश्रा यांच्या समर्थकांसोबत संघर्ष झाला होता. या हिंसेत 8 जणांचा मृत्यू झाला होता. उत्तरप्रदेश पोलिसांच्या एफआयआरनुसार चार शेतकऱ्यांना एका एसयुव्हीने चिरडले होते, या एसयुव्हीतून आशीष मिश्रा प्रवास करत होते. एसयुव्ही चालक आणि दोन भाजप कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांनी हत्या केली होती. हिंसेत एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता.