शहर परिसरात आषाढी एकादशी भक्तिभावाने
मंदिरांतून अभिषेक, अलंकार पूजाविधी : मंदिरांवर विद्युत रोषणाईसह फुलांची आरास : वारकऱ्यांच्या वेशभूषेतील शाळा विद्यार्थ्यांचे आकर्षण
बेळगाव
नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचं दान रे
फक्त भिजव देवा ते तहानलेलं रान रे
मोह नको, अहंकार नको, नको नवे कपडे छान
फक्त यावर्षी पिकू दे माझ्या शेतकऱ्याचं रान
आषाढीच्या निमित्ताने प्रत्येक भक्तांची हीच भावना या काव्यपंक्तींतून जणू व्यक्त झाली आहे. शेतकरी शेतात राबतो म्हणून तर आपण अन्नधान्य मिळवू शकतो. विठ्ठल तर त्यांचा हक्काचा. विठ्ठलाच्या चरणी केवळ पंढरपुरीच नव्हे तर बेळगावनगरीच्या भाविकांनी याच भावना व्यक्त केल्या. शहर परिसरात आषाढी एकादशी अत्यंत श्रद्धेने आणि तितक्याच भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
शहरात अनेक ठिकाणी विठ्ठल मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमधून बुधवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर परिसरात तर सर्वात जुने असे विठ्ठल मंदिर आहे. याशिवाय नामदेव-दैवकी विठ्ठल मंदिर, खडेबाजार, बेळगाव येथील विठ्ठलदेव मंदिर यासह अन्य मंदिरांमध्ये पहाटे अभिषेक, अलंकार पूजा असे धार्मिक विधी पार पडले. विठ्ठल मंदिरांवर विद्युत रोषणाई करून रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती.
शहापूर विठ्ठल मंदिरमध्ये पहाटे काकडारती झाली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दुपारी 4 वा. हेरंब देऊळकर यांचे प्रवचन झाले. महाद्वार रोड, क्रॉस नं. 3 येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये अभिषेक व महापूजा झाली. सोनोली येथील भजनी मंडळाचे भजन होऊन पालखी सोहळा झाला. बाजार गल्ली, वडगाव येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये विठ्ठल मंदिर विकास समितीच्यावतीने सकाळी 6 वा. वारकरी व भक्तांच्यावतीने अभिषेक घालण्यात आला. यानंतर 10 वा. भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.
सकाळी 11 वाजता जागृती महिला स्वावलंबन केंद्रातर्फे तसेच दुपारी 12 वा. दशांकिनी भजनी मंडळ यांच्यातर्फे विष्णू सहस्रनाम पठण झाले. दुपारी 3 ते 4 समीरा मोडक यांच्यावतीने भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. दुपारी 4 वा. जिव्हेश्वर महिला भजनी मंडळातर्फे शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भजन झाले. सायंकाळी 6 वा. गजानन घाटगे, मुकुंद गोरे व अर्चना ताम्हणकर यांनी भक्तिगीते सादर केली. 7.30 वा. विठ्ठल मंदिर सांप्रदायिक भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री 10 वा. आरती झाल्यानंतर सांगता झाली.
कार पार्किंग, बापट गल्ली येथे सकाळी 6 पासून भजन, काकडारती, अभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. नागेश बिर्जे, अॅड. सदाशिव हिरेमठ व निवृत्ती सदरे यांच्या हस्ते काकडारती झाली. विवेक हंगिरगेकर व त्यांच्या पत्नीच्या हस्ते तसेच सुहास किल्लेकर यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गोडसे भटजी यांनी पौरोहित्य केले. यावेळी हिरेमठ यांनी आषाढीचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन महेश पावले यांनी केले. प्रभाकर कणबर्गी यांनी आभार मानले. या सोहळ्यासाठी मंडळाच्या सर्व सेवेकरींनी परिश्रम घेतले.
अनगोळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नाथ पै नगर येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पहाटे विठ्ठल मूर्तीला श्रीकांत पंडित दांपत्याच्यावतीने अभिषेक व काकडारती करण्यात आली. यावेळी गावातील महिला, संत मंडळींनी व भाविकांनी दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिर कमिटीचे सदस्य, कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.