तालुक्यात घुमला विठू नामाचा गजर
आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी : भजन, प्रवचन, कीर्तन आदी आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर/किणये
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव.... या अभंगाप्रमाणे तालुक्यात रविवारी दिवसभर विठू नामाचा गजर झाला. आषाढी एकादशीनिमित्त गावागावांमध्ये असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरांमध्ये काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन आदी आध्यात्मिक कार्यक्रम झाले. आषाढी एकादशी तालुक्यात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांमध्ये सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरे आहेत. या मंदिरांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करण्यात आली होती. तसेच आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांना फुल, हारांची सजावट केली होती.
विठ्ठलाच्या भक्तीत रममान वारकरी
याचबरोबर रेल्वे, खासगी वाहने, टेम्पो व बसमधूनही अनेक भाविक पंढरपूरला गेलेले आहेत. दिंडीतून गेलेल्या भक्तांना 15 ते 20 दिवस रोज पायी चालत जावे लागते. दिंडीत चालत जाताना केवळ आणि केवळ विठुनामाचा गजर चालू असतो. विठ्ठलाचे विविध अभंग टाळ मृदंगाच्या गजरात म्हणण्यात येतात. हे म्हणत असताना आपण देहभान विसरून केवळ विठ्ठलाच्या भक्तीत रममान होतो, असेही काही वारकऱ्यांनी सांगितले.
विविध गावांतील मंदिरांमध्ये भक्तांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन
तालुक्याच्या विविध गावांतून अनेक वारकरी व भक्तमंडळी पंढरपूरला गेलेले आहेत. ज्यांना पंढरपूरला जाता आले नाही. त्या भक्तांनी आपापल्या गावातील व विविध भागातील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती झाली. त्यानंतर पूजा, महाआरती, भजन, सायंकाळी प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम झाले. सध्याच्या आधुनिक व धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी चिंताग्रस्त बनलेला आहे. मानसिक समाधान मिळण्यासाठी केवळ आणि केवळ भगवंताचे नामस्मरण करणे हाच एकमात्र उपाय आहे, असे कीर्तनकारांनी भक्तांना सांगितले.
शाळा-कॉलेजमधून दिंडी
किणये येथील मराठा मंडळ हायस्कूल, शंकरराव पाटील कॉलेज व इंग्रजी माध्यम शाळा यांच्यावतीने शनिवारीच एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी काढण्यात आली. ही दिंडी हायस्कूलपासून सुरुवात झाली. तसेच दिंडीची सांगता किणये येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात झाली. त्या ठिकाणी मुख्याध्यापक, प्राध्यापक यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन करून पुन्हा दिंडी किणये, बहाद्दरवाडी रस्त्यावरून मार्गस्थ झाली आणि हायस्कूलमध्ये दिंडीची सांगता झाली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. तसेच काही विद्यार्थ्यांनी संत महात्म्यांच्या वेशभूषा परिधान केलेल्या होत्या. त्यामुळे या दिंडीचे सर्वांनाच आकर्षण वाटत होते.
बेळगुंदी, बिजगर्णी, देसूर,राजहंसगड,हलगा गावांत विविध कार्यक्रम
किणये गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे काकड आरती करण्यात आली. दिवसभर भजन, सायंकाळी प्रवचन आदी कार्यक्रम झाले. बेळगुंदी गावच्या वेशीवर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. या मंदिरात पहाटे काकड आरती करण्यात आली. दिवसभर भजन आदी कार्यक्रम झाले. पंचक्रोशीतील भक्तांनी या मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. वाघवडे, संतिबस्तवाड, कावळेवाडी, बिजगर्णी, इनाम बडस, बाकनुर, बाची, बामणवाडी, बाळगमट्टी, जानेवाडी, नावगे, बहाद्दरवाडी, झाडशहापूर, देसूर, राजहंसगड, हलगा, बस्तवाड गावातील मंदिरांत एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कडोली विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी
कडोली येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात श्री कल्मेश्वर भजनी मंडळ आणि श्री कल्मेश्वर वारकरी भजनी मंडळाच्या वतीने दिवसभर भजनाचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशीच्या निमित्त दोन मंदिरांत भाविकांनी गदी केली होती. विठ्ठल नामाचा गजराने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कंग्राळी भागात आषाढी एकादशी साजरी
काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल..च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, यमनापूर, गौंडवाड परिसरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी मोठ्या भक्तिभावाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये रविवारी सकाळी वारकरी भजनी मंडळ व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर असंख्य भाविकांनी सकाळपासून श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी गावातील भक्तीमय वातावरण पाहून जणू पंढरी अवतरल्याचा भास होत होता.
कंग्राळी खुर्द
कंग्राळी खुर्द वारकरी भजनी मंडळ व ग्रामस्थांतर्फे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी केली. प्रारंभी सकाळी वारकरी भजनी मंडळ व गावातील मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईचे पूजन करण्यात आले. यानंतर गावातील असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
अलतगा
अलतगा वारकरी भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने रविवारी गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आषढी एकादशी साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.