भाग्यनगर येथे आशा कार्यकर्तीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
बेळगाव : शहर व उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. गुरुवारी भाग्यनगर येथे दैनंदिन कामानिमित्त आलेल्या आशा कार्यकर्त्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महानगरपालिका याचा बंदोबस्त करणार का? असा सवाल रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे. आशा कार्यकर्त्यांना आरोग्य खात्याकडून विविध कामांची जबाबदारी सोपविली आहे. त्यानिमित्त भाग्यनगर येथे घरोघरी जाऊन दैनंदिन काम करत असताना अचानक पाठीमागून आलेल्या भटक्या कुत्र्याने आशा कार्यकर्त्यांच्या गटावर हल्ला केला. यामध्ये काही कार्यकर्त्यांनी पळून जाऊन कुत्र्याच्या हल्ल्यातून बचाव करून घेतला.
तर एका महिला कार्यकर्तीचा कुत्र्याने चावा घेतला. तर आणखी एक कार्यकर्ती यामध्ये जखमी झाली आहे. कसेबसे करून कुत्र्याच्या हल्ल्यातून सुटका करताना आशा कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. भाग्यनगर परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, मॉर्निंग वॉकर यांच्यावरही हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत 25 जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. जखमी झालेल्या आशा कार्यकर्तीवर वडगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना देण्यात आली असून यावर ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.