आसारामबापू 30 दिवसांसाठी कारागृहातून ‘पॅरोल’वर बाहेर
आयुर्वेदिक ऊग्णालयात उपचार घेणार; 11 वर्षात दुसऱ्यांदा पॅरोल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसारामबापू तुरुंगातून बाहेर आला आहे. 7 नोव्हेंबर रोजी जोधपूर उच्च न्यायालयाने आसारामला उपचारासाठी 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. जोधपूरमधील भगत की कोठी येथील खासगी आयुर्वेदिक रुंग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. रविवारी रात्री त्याला रुंग्णवाहिकेतून हॉस्पिटमध्ये रवाना करण्यात आले. उपचारासाठी आसारामला पॅरोल मंजूर होण्याची ही 11 वर्षांतील दुसरी वेळ आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम आता वयोमानानुसार अस्वस्थ होत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे यापूर्वी आसारामला ऑगस्टमध्ये उपचारासाठी 7 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील माधवबाग आयुर्वेद रुंग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. नंतर त्याचा पॅरोल 5 दिवसांनी वाढवण्यात आला. आता पुन्हा त्याला आरोग्याची कारणे सतावत असल्यामुळे आसारामच्या वतीने राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठात उपचारासाठी दीर्घ पॅरोलची मागणी करणारा अर्ज दाखल करण्यात आला होता. 7 नोव्हेंबर रोजी जोधपूर उच्च न्यायालयाने त्याला खासगी आयुर्वेदिक ऊग्णालयात उपचारासाठी 30 दिवसांची परवानगी दिली आहे.
तीन दिवसांपूर्वीही आसारामबापू याला वैद्यकीय तपासणीसाठी जोधपूर एम्समध्ये पाठवण्यात आले होते. आता तो खासगी रुंग्णालयात उपचार घेत असून, त्याचा संपूर्ण खर्च त्याला करावा लागणार आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती दिनेश मेहता आणि न्यायमूर्ती विनीत माथूर यांच्या खंडपीठाने आसारामला उपचारासाठी 30 दिवसांच्या पॅरोलवर मंजुरी दिली.