For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपचाराच्या निमित्ताने आसारामबापू तुरुंगाबाहेर

06:06 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
उपचाराच्या निमित्ताने आसारामबापू तुरुंगाबाहेर
Advertisement

जोधपूरहून मुंबईला रवाना : फक्त डॉक्टर आणि सहाय्यकांना भेटण्याची अनुमती

Advertisement

वृत्तसंस्था/ जोधपूर

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आसारामबापू यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. उपचाराच्या निमित्ताने ते तुरुंगाबाहेर पडले असून मंगळवारी उपचारासाठी मुंबई-खोपोलीला रवाना झाले. आसारामबापू यांना अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली असून डॉक्टर आणि साहाय्यकाशिवाय अन्य कोणालाही ते भेटू शकणार नाहीत.

Advertisement

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना विमानाने पाठवण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आसाराम यांना तुरुंगातून अॅम्ब्युलन्समधून विमानतळावर आणण्यात आले. यावेळी त्यांचे अनेक भक्त दर्शन घेण्यासाठी आतुर झाले होते. मात्र पोलिसांनी कोणालाही त्यांच्याजवळ पाठवले नाही. सुरक्षेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

न्यायमूर्ती पुष्पेंद्र भाटी आणि न्यायमूर्ती मुन्नारी लक्ष्मण यांच्या खंडपीठाने 13 ऑगस्ट रोजी जोधपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामबापू यांना जोधपूर एम्सच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे सात दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. न्यायालयाने आपल्या आदेशात आसारामबापूंवर अनेक निर्बंध घातले आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत सोयीनुसार साहाय्यक असतील, याशिवाय त्यांना डॉक्टरची नियुक्ती करता येईल, परंतु याव्यतिरिक्त कोणीही त्यांना भेटू शकणार नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या सूचनेनुसार आसारामला पोलिसांच्या ताफ्यासह मुंबईला पाठवण्यात आले आहे, तेथून ते उपचारासाठी खापोलीतील माधवबाग रुंग्णालयात पोहोचतील. आसाराम मंगळवारी दुपारी 2.20 वाजता जोधपूरहून मुंबईला जाण्यासाठी इंडिगोच्या नियमित विमानाने रवाना झाले. जोधपूरचे पोलीस उपनिरीक्षक भंवर सिंह आणि पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत.

Advertisement
Tags :

.