असनिये ग्रामस्थांची शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयावर धडक
असनिये ते घारपी रस्त्याचे काम सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी
मुख्यमंत्री सडक योजनेतून नऊ महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या असनिये मुख्य रस्ता ते घारपी रस्त्याचे अद्याप काम सुरू न झाल्याने असनियेच्या ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी कार्यालयावर धडक दिली. ग्रामस्थांनी ४ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ५ जानेवारीला बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे .असनिये घारपी रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून तीन कोटी 75 लाख रुपये मंजूर झाले होते. काम ठेकेदार दिलीप नार्वेकर यांनी घेतले .परंतु ९ महिने होऊनही काम सुरू झाले नाही .रस्ता वाहतुकीसाठी अयोग्य बनला आहे .असनिये गावात शिगमा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अद्याप काम सुरू न झाल्याने या उत्सवावरही परिणाम होणार आहे. रस्ता खराब झाल्याने वाहने चालविणे सोडाच चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,गजा नाटेकर यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यांनी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत काम करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थ शांत आले .सरपंच रेश्मा सावंत ,उपसरपंच साक्षी सावंत, सामाजिक कार्यकर्ते, संदीप सावंत यांच्यासह 90 ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी निवेदन देण्यात आले.