बेळगाव जिल्ह्यात तब्बल 100 पर्यटनस्थळे
2024-29 च्या नव्या धोरणानुसार राज्यात एकूण 1,275 पर्यटनस्थळे निश्चित
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात पर्यटन क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी कर्नाटक पर्यटन धोरण-2024-29 जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 1,275 पर्यटनस्थळे असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 100 पर्यटनस्थळे असल्याचा उल्लेख आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती पर्यटन खात्याकडे सादर केली होती. त्यानुसार पर्यटनस्थळांच्या संख्येत बेळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्याच्या पर्यटन खात्याच्या सचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. पर्यटन खात्याच्या आयुक्तांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी कर्नाटक पर्यटन धोरण-2024-29 ला मंजी दिली आहे. त्यामुळे यापूर्वीच्या धोरणासंबंधी सरकारचे सर्व आदेश रद्दबातर ठरत असल्याचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला आहे.
पर्यटन खात्याने नवीन पर्यटनस्थळे निश्चित करण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांशी संबंधित ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक आणि अधिक पर्यटक भेटी देणाऱ्या प्रमुख पर्यटनस्थळांची प्राधान्यानुसार क्रमवारीसह तपशिलवार यादी सादर करण्याचे सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पर्यटन विकास समित्यांना निर्देश दिले होते.
त्यांच्याकडून आलेल्या माहितीच्या आधारे राज्यात 1,275 पर्यटनस्थळांचा समावेश 2024-29 च्या पर्यटन धोरणात करण्यात आला आहे. याला सरकारने मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. प्रस्तावात स्पष्ट केलेल्या अंशाच्या आधारे एकूण 1,275 पर्यटनस्थळे निश्चित करून काही शर्तींवर मंजुरी देण्यात आली आहे. या ठिकाणी विकासकामे राबविण्यासाठी अनुदानाच्या उपलब्धतेनुसार विस्तृत कृती आराखडा तयार करावा, अनुदानाचा खर्च, नकाशा तयार करून तांत्रक पडताळणी करून निविदा मागविण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
मंड्या जिल्ह्यात सर्वाधिक 106 पर्यटनस्थळे आहेत. यापाठोपाठ बेळगाव जिल्ह्याचा दुसरा तर चिक्कबळापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. बेळगाव जिल्ह्यात 100 तर चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात 95 लहान-मोठी पर्यटनस्थळे आहेत. बागलकोट जिल्ह्यात 28, विजापूर जिल्ह्यात 33, धारवाड जिल्ह्यात 30, कारवार जिल्ह्यात 85 पर्यटनस्थळे आहेत.