आर्यना साबालेन्का, अमांदा अॅनिसिमोव्हा अंतिम फेरीत
ओसाका, जेसिका पेगुला यांचे आव्हान समाप्त, भांब्री-व्हीनसच्या स्वप्नवत घोडदौडीला ब्रेक
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
बेलारुसची अग्रमानांकित व विद्यमान विजेती आर्यना साबालेन्काने जेसिका पेगुलाचे आव्हान संपुष्टात आणत अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमांदा अॅनिसिमोव्हाने चार ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत स्थान मिळविले. शनिवारी साबालेन्का व अॅनिसिमोव्हा यांच्यात जेतेपदाची लढत होईल. पुरुष दुहेरीत न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनससमवेत खेळणाऱ्या भारताच्या युकी भांब्रीच्या विजयी घोडदौडीला उपांत्य फेरीत ब्रेक लागला.
साबालेन्काने चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाला 4-6, 6-3, 6-4 असे हरवित सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून जेतेपद स्वत:कडेच राखण्याची तिला संधी मिळाली आहे. पहिला सेट पेगुलाने जिंकल्यानंतर दुसरा सेट साबालेन्काने जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये साबालेन्काने तिसऱ्या मॅचपॉईंटवर सामना संपवला. गेल्या वर्षी या दोघींतच अंतिम लढत झाली होती आणि साबालेन्काने तिला हरवून जेतेपद पटकावले होते. साबालेन्काने आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून तिन्ही हार्डकोर्टवर मिळविलेली आहेत. त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियन ओपन, जूनमध्ये प्रेंच ओपनमध्ये तिला उपविजेतेपद मिळाले तर विम्बल्डनमध्ये तिला अॅनिसिमोव्हाने उपांत्य फेरीत हरविले होते.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात आठव्या मानांकित अमेरिकेच्या अमांदा अॅनिसिमोव्हाने 23 व्या मानांकित ओसाकाचा 6-7 (4-7), 7-6 (7-3), 6-3 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून अंतिम फेरी गाठली. महिला टेनिसमध्ये या दोघींनाही पावरफुल हिटर्स म्हणून ओळखले जाते. 24 वर्षीय अॅनिसिमोव्हाने सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅममध्ये अंतिम फेरी गाठली आहे. सुमारे तीन तास ही झुंज रंगली होती.
पराभवातही युकी भांब्री-मायकेल व्हीनस यांची झुंज
पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांब्रीच्या विजयी घोडदौडीला उपांत्य फेरीत ब्रेक लागला. मायकेल व्हीनससमवेत खेळताना भांब्रीला अतिशय रोमांचक ठरलेल्या लढतीत ब्रिटनच्या अनुभवी व सहाव्या मानांकित नील स्कुपस्की व ज्यो सॅलिसबरी या जोडीने 6-7 (2-7), 7-6 (7-5), 6-4 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र भांब्रीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत वैयक्तिक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. ग्रँडस्लॅमच्या पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा तो भारताचा चौथा टेनिसपटू आहे. याआधी लियांडर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा यांनी अशी कामगिरी केली आहे. उपांत्य फेरी गाठताना भांब्री-व्हीनस यांनी चौथ्या मानांकित व 11 व्या मानांकित जोड्यांचा पराभव केला. ‘आपल्यासाठी हा खास सप्ताह असून या स्तरावर आणि स्लॅमची उपांत्य फेरी गाठणे ही माझ्यासाठी फार मोठी कामगिरी आहे,’ असे भांब्री सामन्यानंतर म्हणाला. या कामगिरीनंतर दुणावलेल्या आत्मविश्वासह त्याला दुहेरीच्या मानांकनातही बढती मिळणार आहे.