For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या निवडणुकीत अरविंद पाटील यांचे वर्चस्व

11:52 AM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या निवडणुकीत अरविंद पाटील यांचे वर्चस्व
Advertisement

सर्व 13 ही जागांवर एकहाती विजय : नंदगड येथे विजयोत्सव साजरा,आज खानापुरात विजयोत्सव

Advertisement

वार्ताहर/नंदगड 

येथील खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या दि. 12 रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 पैकी दहा जागांवर प्रत्येकी एकेक अर्ज शिल्लक राहिल्याने दहा जण बिनविरोध निवडून आले होते. रविवारी तीन जागांसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये तिन्हीही जागा अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनेच जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा नंदगड मार्केटिंग सोसायटीवर माजी आमदार व मार्केटिंग सोसायटीचे विद्यमान चेअरमन अरविंद पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

Advertisement

तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल-

रविवारी तीन जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. त्यामध्ये 1220 मतदारांपैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडून आलेल्यांमध्ये परिशिष्ट जाती गटातील जागेसाठी जितेंद्र मादार यांना 803 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी देवाप्पा मादार यांना 111 मते मिळाली. परिशिष्ट जमाती गटातून निंगाप्पा तळवार यांना 837 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी निंगाप्पा नाईक यांना 82 मते मिळाली.  तर ब गटातून महारुद्रय्या हिरेमठ यांना 833 मते मिळाली, त्यांचे प्रतिस्पर्धी  रुक्माण्णा जुंजवाडकर यांना 90 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकारी शशिकला पाटील यांनी जितेंद्र मादार, निंगापा तळवार, महारुद्रय्या हिरेमठ यांना विजयी घोषित केले. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये अ-वर्ग सहकार संघ गटामधून विद्यमान चेअरमन अरविंद पाटील, विद्यमान संचालक श्रीशैल माटोळी (चुंचवाड), चांगाप्पा बाचोळकर, दामोदर नाकाडी, जोतिबा भरमप्पनावर, प्रकाश गावडे, उदय पाटील, ब-वर्ग वैयक्तिक सदस्यांकडून मागास अ-वर्ग गटातून रफिक हलशीकर, महिला गटातून तेजस्विनी होसमणी, पार्वती पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणुकीसाठी सकाळपासून मतदारांनी निवडणूक स्थळावर मोठी गर्दी केली होती. दुचाकी, चार चाकी वाहनांतून गटागटाने मतदार येत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नंदगड पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निकाल जाहीर होताच पॅनेलप्रमुख माजी आमदार अरविंद पाटील व सर्व संचालकांचा मार्केटिंग सोसायटीच्यावतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यांच्या चाहत्यांनी फटाके व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. नंदगड गावातील मुख्य रस्त्यावरून विजयोत्सव मिरवणूक काढण्यात आली. नंदगड मार्केटिंग सोसायटीवर अरविंद पाटील यांच्या पॅनेलचे वर्चस्व सिद्ध झाल्याने अरविंद पाटीलसह सर्व संचालकांची विजयोत्सव मिरवणूक खानापूर येथे सोमवार दि. 13 रोजी दुपारी 4 वाजता काढण्यात येणार आहे. बसवेश्वर चौकापासून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर खानापुरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक निघणार आहे. शिवाय बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अरविंद पाटील यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.