मालवण, देवगड तालुक्याची जबाबदारी अरविंद मोंडकरांकडे
काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून निवड
मालवण/प्रतिनिधी
आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणूकीसाठी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्याजवळ मालवण आणि देवगड तालुक्याची जबाबदारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांनी सोपविली आहे.शेख यांनी पाठविलेल्या नियुक्ती पत्रमध्ये असे म्हटले आहे की, आपली मालवण व देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच मालवण नगरपरिषदेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. उमेदवारांचे अर्ज मागवणे, उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवणे, आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी संदर्भात चर्चा करणे हे सर्व अधिकार आपल्याला देण्यात येत आहेत. ही सर्व कामे त्या-त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तसेच जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून आपण दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल याची पक्षाला खात्री आहे, असे म्हटले आहे.