अरविंद चिदंबरमला चेन्नई ग्रँडमास्टर्सचे जेतेपद,
वृत्तसंस्था/ चेन्नई
ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने शेवटच्या दोन ‘क्लासिकल’ फेऱ्यांमध्ये उशिरा घेतलेल्या उसळीच्या जोरावर चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळविले असून अपराजित राहिलेल्या व्ही. प्रणवला चॅलेंजर्स गटातील किताब प्राप्त झाला आहे.
मास्टर्स गटात अव्वल स्थानासाठी तिहेरी चुरस राहून अरविंदने पहिल्या ब्लिट्झ प्ले-ऑफमध्ये लेव्हॉन अरोनियनचा पराभव केला आणि नंतर स्पर्धेची दुसरी आवृत्ती जिंकताना काळ्या सोंगाट्यासह दुसरा सामना बरोबरीत सोडविला. अरविंदने त्यापूर्वी स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवून विजेतेपदाच्या शर्यतीत प्रवेश केला आणि संयुक्तपणे आघाडीवर असलेल्या अर्जुन एरिगेसी, लेव्हॉन अरोनियन यांच्याशी बरोबरी साधली.
त्याआधीच्या फेरीत अर्जुनला पराभूत करून त्याची अपराजित वाटचाल संपुष्टात आणणाऱ्या अरविंदने परहम मगसुदलूविऊद्धच्या शेवटच्या फेरीच्या सामन्यात काळ्या सेंगाट्यासह वर्चस्व गाजवून विजय मिळविला. इतर सामन्यांत अरोनियनने अमिन तबताबाईशी बरोबरी साधली, तर अर्जुनला मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्हविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. टायब्रेकरच्या उत्तम गुणांसह अरविंदने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावल्याने अरोनियन आणि अर्जुन दोन ब्लिट्झ प्ले-ऑफमध्ये आमनेसामने आले आणि दोन्ही खेळाडूंनी काळ्या सोंगाट्यांसह आपापला सामना जिंकल्याने सडथ डेथचा अवलंब करावा लागला.
त्यात अरोनियनने काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना अर्जुनला बरोबरीत रोखून अरविंदविऊद्ध अंतिम फेरी गाठली. विजेतेपदाच्या लढतीत अरोनियनने उशिरा केलेल्या चुकीचा फायदा अरविंदने घेत पहिल्या ब्लिट्झ गेममध्ये पांढऱ्या सेंगाट्यासह विजय मिळविला आणि नंतर काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना प्रतिस्पर्ध्याला बरोबरीत रोखले. सात ‘क्लासिकल’ फेऱ्यांनंतर तीन खेळाडू 4.5 गुणांनिशी संयुक्तपणे अव्वल राहिलेले असल्याने तिघांनाही प्रत्येकी 11 लाख ऊपयांचे रोख बक्षीस मिळाले.