कौटुंबिक जिव्हाळ्याच्या श्रावण आठवणी, Arundhati Mahadik यांच्याशी मनमोकळ्या गप्पा
रंगल्या भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती धनंजय महाडिक यांच्याशी ‘श्रावण गप्पा’
By : गौतमी शिकलगार, दिव्या कांबळे
कोल्हापूर : श्रावणाच्या पावसाळी सरी, ताज्या मातीतला सुगंध, आणि सणांचा गोडवा... अशा वातावरणात रंगल्या भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती धनंजय महाडिक यांच्याशी ‘श्रावण गप्पा’. माहेर फलटणचे नाईक-निंबाळकर घराणे, सासर महाडिक घराणं अशा दोन ऐतिहासिक परंपरा अंगी बाळगून त्या जगतात.
बालपणीच्या सणांच्या आठवणींपासून ते राजकीय जीवनातील जबाबदाऱ्या, घरगुती परंपरांपासून ते स्वत:साठी काढलेल्या आनंदाच्या क्षणांपर्यंत, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पान हे रंगीबेरंगी अनुभवांनी भरलेलं आहे.
तुमच्या आयुष्यातला पहिला श्रावण कधी फुलला?
उत्तर : आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण आलेत. पण 2014 साली साहेब पहिल्यांदा खासदार झाले, तो क्षण अत्यंत आनंदाचा होता. असं वाटलं जणू सगळे देव-देवता घरात येऊन आशीर्वाद देतायत. इतका आनंद होता, कारण त्यासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली होती. माझं विश्व म्हणजे माझं कुटुंब. स्वत:साठीचा आनंद म्हणजे निसर्गात वेळ घालवणे, स्वत:ला थोडा वेळ देणे, आवडती सिरियल पाहणे. प्रवासालाही बहुतेक वेळा कुटुंबासोबतच जाते, एकटी जाण्याचा अनुभव फारसा नाही. मिळेल तेव्हा स्वत:ला वेळ देणं हाच माझा सर्वात मोठा आनंद आहे. मी माझी लाईफ एन्जॉय करते.
लहानपणीचा ‘श्रावण’ कसा होता?
उत्तर : अतिशय सुंदर! आमच्यात एकत्र कुटुंब पद्धती होती. माझं माहेर फलटणचं नाईक-निंबाळकर घराणं. श्रावणात सण-समारंभाची रेलचेल असायची. गौरी-गणपती, संक्रांत... सगळ्या सणांना नातेवाईकांची गर्दी असायची. जेवणातलं थोडं शेजाऱ्यांना द्यायची पद्धत होती. आई ताट सजवून द्यायची, मी आणि बहीण ते घेऊन जायचो, आणि तिथं काय मिळणार याची उत्सुकता असायची. सोशल मीडियाचा काळ नव्हता, त्यामुळे सण-समारंभाचा खरा आनंद आम्ही घेतला.
गौरी-गणपतीच्या आठवणी सांगा
उत्तर : मोठं कुटुंब असल्याने ‘मुलीला सगळं यायला हवं“ ही परंपरा होती. लहानपणापासून काकी बोलवायच्या ‘चल, बस, लाडू वळून दाखव, करंजी भर’ करंजी फुटली तर त्यावर हसणं, चकली कधी करणार याची वाट पाहणं... हा सगळा मजेशीर भाग होता. गौरीला साडी नेसवणं, घर सजवणं, सगळं आम्ही मिळून करायचो. हा आनंद मनापासून लुटला.
महाडिक घराण्यात ‘श्रावण’ कसा साजरा होतो?
उत्तर : श्रावण आला की दर सोमवारी काहीतरी गोडधोड बनतं. कधी तेलाच्या पोळ्या, तर कधी पिठाच्या पोळ्या. लवकर लग्न झाल्याने सासूबाईंकडून बरंच शिकायला मिळालं. त्यांच्या हाताखालीच आम्ही तयार झालो.
तुमच्या सूनबाई वैष्णवींनी हळदीच्या कुंडातून ठसे उमटवले होते?
उत्तर : ही एक सुंदर परंपरा आहे. हाताचे ठसे म्हणजे लक्ष्मीचं घरात आगमन. म्हणतात, गौराई आली की समाधान, सुख-आनंद घेऊन आली आणि त्या ठशांमधून लक्ष्मीचं स्वागत होतं.
राजकीय नेत्याची पत्नी म्हणून दडपण येतं का?
उत्तर : थोडंफार नक्कीच येतं. पण खरं सांगायचं तर आमचं आयुष्यही सामान्य कुटुंबासारखंच आहे. सण-समारंभ साजरे करणं, मुलांना चांगले संस्कार देणं, घर चालवणं. फक्त काय बोलतो यावर लक्ष द्यावं लागतं. व्यवसाय-वाढ, मुलं आणि साहेबांमधल्या चर्चांचा आनंद घेणं, पण सगळ्याला मर्यादा असणं महत्त्वाचं. सर्वांना आदर देणं हीच खरी जबाबदारी.
साहेबांना पहिल्यांदा कधी भेटलात?
उत्तर : आमची भेट आणि लग्न एका महिन्यात झालं. ते बघायला आले, तेव्हा मी पुण्यात राहात होते. बघायला येत असल्याचा निरोप आला. तेव्हा मी लहान असल्याने फारसं कळत नव्हतं, थोडी भीती होती. त्यावेळी सासरेही होते. त्यांचा जो औरा होता तो इतका जबरदस्त होता की मी मान खाली घालून बसलेले. त्यावेळी मी साहेबांना बघितलं नव्हतं. आठवड्यानंतर साखरपुडा झाल्यानंतर मी त्यांना व्यवस्थित बघितलं. मग नंतर तीन आठवड्यात आमचं लग्न झालं. लग्नाआधीची आमची एकच भेट झाली.
महिलांना राजकारणात येण्यासाठी काय सल्ला द्याल?
उत्तर : महिलांनी नक्कीच पुढं यायला हवं. घर सांभाळण्याची जिद्द आणि व्यवस्थापन कौशल्य राजकारणातही कामी येतं. सतत नवं शिकत राहावं, बदल स्वीकारावा. पुरुषप्रधान समाजात महिलांनी आपलं स्थान मिळवलं आहे. जबाबदारी आली की शिकून घ्यावं, समजून घ्यावं प्रगती आपोआप होते.
महिलांना घरकाम येणं गरजेचं आहे का?
उत्तर : अत्यावश्यक नाही, पण दोन्ही गोष्टी म्हणजे घरकाम आणि आर्थिक व्यवस्थापन सांभाळता आल्या तर उत्तम. आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. फक्त पुरुषांच्या कमाईवर घर चालणं कठीण आहे. महिलांनी कमाई केली तर मुलांचं शिक्षण, घरखर्च सगळं नीट जुळवता येतं.
साहेबांमुळे कधी राग आला आहे का?
उत्तर : नवरा-बायकोमध्ये थोडे-फार प्रसंग आलेच पाहिजेत. राग जरी आला तरी तो तेवढ्यापुरता असतो. भांडण झालं तरी मीच आधी माफी मागते. नंतर मित्रांसारखं होतं.
स्वत:ला वेळ देता का? छंद कसा जोपासता ?
उत्तर : हो, देण्याचा प्रयत्न करते. मैत्रिणींना भेटणं, एकत्र ट्रिपला जाणं, पिक्चर पाहणं... हा माझा आनंद आहे. थोडा वेळ मिळाला की मी स्वत:साठी काढते. कुटुंबासोबतच मैत्रिणींनाही वेळ देणं माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं.
पहिल्यांदा एकत्र पाहिलेला पिक्चर?
उत्तर : ‘रंगीला“ आमिर खान आणि उर्मिला मातोंडकरचा. पण आम्ही दोघंच नव्हतो, मोठी गँग होती. साहेबांचे मित्र, माझ्या नणंद... साहेबांना पिक्चरची प्रचंड आवड आहे, त्यामुळे चांगला सिनेमा आला की जातोच. दिल्लीत किंवा बाहेर असतो त्यावेळी आम्ही जातो बघायला.
कधी पिक्चर किंवा ट्रिप अर्धवट सोडावी लागली आहे का?
उत्तर : पिक्चर नाही, पण ट्रिप नक्कीच! राजकारणात असल्याने अचानक मिटिंग येऊ शकते. एकदा गोव्याला जाताना फोन आला आणि परत यावं लागलं. राग आला पण काही करता आलं नाही. मग भरपाई म्हणून 2 दिवसांची ट्रिप 4 दिवसांची केली