अरुणाचलच्या लेकीची चीनमध्ये अडवणूक
भारतीय पासपोर्टवरून चौकशीच्या फेऱ्यात : शांघाय विमानतळावर रोखले, 18 तास उपाशी ठेवले
वृत्तसंस्था/ शांघाय, नवी दिल्ली
अरुणाचल प्रदेशवरून भारत आणि चीनमधील सीमावाद अनेक दशके जुना असतानाच एक नवीन घटना समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या पेमा थोंगडोक या महिलेला चीनमधील शांघाय विमानतळावर चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्यात आले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी तिचा भारतीय पासपोर्ट वैध मानण्यास नकार दिल्याचा आरोप या महिलेने केला आहे. चिनी अधिकाऱ्यांनी तिला शांघाय विमानतळावर तब्बल 18 तास ताब्यात ठेवत विनाकारण मानसिक त्रास दिल्याचा दावा केला जात आहे. आपल्याशी घडलेल्या या प्रकाराबाबत तिने सोशल मीडियावर भाष्य केले असून पंतप्रधान मोदींनाही पत्र लिहिल्याचे समजते.
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या पेमा थोंगडोक यांनी आरोप करत चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आपल्याला शांघाय विमानतळावर तासन्तास ताब्यात ठेवत त्रास दिल्याचे म्हटले आहे. चिनी अधिकाऱ्यांनी तिचा भारतीय पासपोर्ट स्वीकारण्यास नकार दिला. सदर पासपोर्टमध्ये अरुणाचल प्रदेश हे तिचे जन्मस्थान असल्याचे लिहिले होते. ती 21 नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानला प्रवास करत होती. यादरम्यान शांघाय पुडोंग विमानतळावर तीन तासांचा ट्रान्झिट कालावधी असताना तिचा पासपोर्ट अवैध घोषित करण्यात आला. अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे सांगत भारताचा उल्लेख असल्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. यादरम्यान तब्बल 18 तासांपर्यंत तिला विमानतळावर तिष्ठत ठेवण्यात आले होते. पेमा यांनी याबाबत पंतप्रधान मोदी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार लिहून हे वर्तन भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
पासपोर्ट जप्त, बोर्डिंग करण्यास नकार
पेमा हिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. तसेच कायदेशीर व्हिसा असूनही तिला जपानला जाणाऱ्या पुढील विमानात चढू देण्यात आले नाही. याप्रसंगी तिथे उपस्थित असलेल्या अनेक इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी आपली थट्टा-मस्करी केल्याचा आरोपही पेमा यांनी केला. तसेच या काळात तिला योग्य माहिती देण्यात आली नाही, नाश्ता-जेवणही पुरविण्यात आले नाही. तसेच विमानतळावरील अन्य सुविधा वापरण्याची परवानगी देण्यात आली नाही, असेही तिने म्हटले आहे.
भारतीय दूतावासाकडून मदत
ट्रान्झिट झोनमध्ये अडकल्यामुळे ती नवीन तिकीट बुक करू शकली नाही, जेवण मागवू शकली नाही किंवा एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर प्रवास करू शकली नाही. अखेरीस ब्रिटनमधील एका मित्राच्या मदतीने पेमाने शांघायमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याला रात्रीच्या फ्लाईटमध्ये बसवून शांघायमधून बाहेर पडण्यास मदत केली. त्यांनी भारत सरकारला हा मुद्दा बीजिंगसमोर उपस्थित करण्याची आणि इमिग्रेशन अधिकारी, विमान कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अरुणाचल प्रदेशातील भारतीय नागरिकांना भविष्यात अशा समस्यांना तोंड द्यावे लागू नये याची खात्री करण्याची विनंती केली आहे.