For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरुणाचल भारताचा हिस्सा : अमेरिका

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरुणाचल भारताचा हिस्सा   अमेरिका
Advertisement

चीनचा जळफळाट : भारताला दिला सतर्क राहण्याचा सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे अमेरिकेनेच स्पष्ट केले आहे. यामुळे चीनचा जळफळाट सुरू झाला आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यम ग्लोबल टाइम्सने भारताच्या विरोधात विष ओकले आहे. भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून सीमावाद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलिकडेच अरुणाचल प्रदेशात एका बोगद्याचे उद्घाटन केले होते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर आक्षेप घेत चीनने अरुणाचल प्रदेशवर स्वत:चा दावा दर्शविला होता. परंतु आता अमेरिकेनेच अरुणाचल हा भारताचा हिस्सा असल्याचे म्हटल्याने चीनच्या संतापात भर पडली आहे. अरुणाचलला भारतीय क्षेत्राच्या स्वरुपात अमेरिका मान्यता देतो तसेच आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी किंवा अतिक्रमण, सैन्य किंवा नागरिकांकडून क्षेत्रीय दाव्यांना पुढे नेण्याच्या कुठल्याही एकतर्फी प्रयत्नांना विरोध करतो, असे अमेरिकेच्या विदेश विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी नमूद केले आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सने आता याप्रकरणी जळफळाट व्यक्त केला आहे. चीनच्या विरोधात असलेल्या शक्तींना अमेरिका समर्थन दर्शवित असल्याचा दावा ग्लोबल टाइम्सकडून करण्यात आला. नेहमीप्रमाणे अमेरिकेने पुन्हा एकदा वस्तुस्थिती आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांकडे दुर्लक्ष करत चीनसोबत वाद असलेल्या देशाचे समर्थन केले आहे. अमेरिकेचे समर्थन केवळ भारताच्या आत्मसंतुष्टतेला प्रोत्साहन देईल. परंतु याचा परिणाम म्हणून चीन आणि भारत सीमेवरील स्थिती अधिक जटिल होणार आहे. एक प्रेक्षकाच्या स्वरुपात अमेरिकेला तेव्हाच लाभ मिळेल, यामुळे भारताने सावध राहण्याची गरज असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. अमेरिका भारत आणि चीनमधील संबंध बिघडवू पाहत असल्याचा दावा ग्लोबल टाइम्सकडून करण्यात आला.

Advertisement

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे आगपाखड

चीन अरुणाचल प्रदेशला जंगनान ठरवून स्वत:चा दावा सांगत आहे. पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यानंतर चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी चीनने अरुणाचल प्रदेशला कधीच भारतीय क्षेत्र म्हणून मान्यता दिली नसल्याचे वक्तव्य केले होते. चीन-भारत सीमेचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. भारत तेथे मनमानी पद्धतीने विकासकामे करत आहे, प्रत्यक्षात भारताला याचा अधिकारच नसल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता.  तर भारताने चीनचे सर्व दावे फेटाळून लावत अरुणाचल प्रदेश हा आमचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले होते.

Advertisement
Tags :

.