Gokul Election : गोकुळमध्ये पुन्हा डोंगळे पर्व?, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरुण डोंगळेंना संधी?
पुढील अध्यक्ष कोण? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक (गोकुळ) संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत संपणार आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष कोण? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. तरी डोंगळे यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविली जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळी व संचालक मंडळास विश्वासात घेऊन केलेले कामकाज, विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या टीकेला दिलेले सडेतोड प्रत्युत्तर, त्यामुळे नेते मंडळींचा बसलेला विश्वास, आमदार विनय कोरेंच्या वारणा दूध संघाच्या कारभारास कोणताही अडथळा न करता गोकुळच्या राबविलेल्या योजना आदी अनेक बाबींचा परिपाक म्हणून डोंगळे यांच्याच गळ्यात पुन्हा अध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
रुण डोंगळे यांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचेही ते विश्वासू आहेत. भविष्यात गोकुळची घोडदौड कायम ठेवण्यासाठी नेत्यांकडून डोंगळे यांना पुन्हा पुढे संधी दिली जाऊ शकते. मे नंतर पुढील पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या काळात नेत्यांच्या विश्वासातील अध्यक्ष असणे आवश्यक आहे. त्यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर गोकुळमधील चित्रदेखील बदलले आहे.
काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची भूमिका सध्यातरी ‘वेट अँड वॉच’ अशी आहे. विरोधकांची सत्ता राज्यात असल्याने गोकुळमधील सत्ताधारी नेत्यांना देखील काही अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ मधील पंचवार्षिक निवडणुकीला मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या मर्जीतील तिसरा अध्यक्ष असावा, जेणेकरून पुढील निवडणुकीत त्याचा फायदा होईल. त्यामुळे असा चेहरा म्हणून पुन्हा डोंगळे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
राजकीय चाणाक्षनीती, मतदारांशी थेट संपर्क जिह्यातील प्राथमिक संस्था, डोंगर कपारीतील, वाड्यावस्त्यांवरील संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक यांच्याशी डोंगळे यांचा थेट संबंध आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये ओव्हररेट कमी करून जिह्यातीलच दूध संकलन वाढवून मागणी तसा पुरवठा केला आणि दूध संघाला कोट्यावधी रुपयांचा नफा प्राप्त करून दिला. पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ असलेला सहभाग, करवीर विधानसभा मतदारसंघात बॅलन्स राखून केलेला प्रचार, प्रशासनावर असलेला वचक आदी डोंगळे यांच्या जमेच्या बाजू आहेत.
आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्यांच्याकडे असलेली राजकीय चाणाक्षनीती व मतदारांशी असलेला थेट संपर्क सत्ताधारी नेत्यांना फायद्याचा ठरणार आहे. दूध उत्पादकांना प्रोत्साहन डोंगळे यांनी नेहमीच दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी दूध खरेदी दरात वाढ केली आहे. तसेच, गाय दूध उत्पादकांनाही चांगला दर मिळावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळच्या दूध संकलन आणि विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे.
आरोप खोडून काढण्यामध्ये डोंगळे यशस्वी
चेअरमन पदाच्या दोन वर्षाच्या कालावधीत संघावर झालेले आरोप खोडून काढण्यात डोंगळे यशस्वी झाले आहेत. संचालक मंडळाला विश्वासात घेऊन दूध उत्पादक शेतकरी, प्राथमिक संस्था व कर्मचाऱ्यांच्या हिताचे योग्य निर्णय त्यांनी घेतले आहेत. राज्याच्या बदललेल्या राजकीय घडामोडीत त्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांबरोबर ठेवलेले आपुलकीचे संबंध व जपलेली बांधिलकी त्यांच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
आमदार विनय कोरे व राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासोबत त्यांचे बंधूतुल्य नाते आहे. तसेच आपल्या कार्यकाळात एकही संचालक नाराज होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे डोंगळेंच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत वाढ होऊ शकते.