आर्तुरा...... भारतीय रोलबॉल ज्युनियर संघांची फिजिओथेरपिस्ट
हल्लीच केनियातील नैरोबी येथे झालेल्या पहिल्या ज्युनियर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेत भारतीय ज्युनियर मुलांच्या आणि मुलींच्या रोलबॉल संघासाठी फिजियो म्हणून काम करून गोव्याची तरूण फिजिओथेरपिस्ट असलेल्या आर्तुरा दोमांदा दा कॉस्ता हिने गोव्यासाठी आणि प्रामुख्याने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. फिजिओथेरपिस्ट म्हणून त्यांचे ध्यैय खेळाडूंना दुखापतीपूर्वीच्या फॉर्मममध्ये परत आणणे, मैदानावरील दुखापतींची वेळेवर काळजी घेणे आणि योग्य रणनीती आणि प्रशिक्षण समर्थनाद्वारे दुखापती टाळण्यासाठी सक्रिय काम करणे आहे. भारताच्या ज्युनियर रोलबॉल खेळाडूंसाठी अशा प्रकारची ही पहिलीच जागतिक स्पर्धा. एक अभिमानास्पद कामगिरी करताना भारताने दोन्ही गटात या स्पर्धेची जेतेपदे मिळवून या खेळातील आपले प्रभूत्व सिद्ध केले.
नैरोबीतील प्रसिद्ध कासारानी स्टेडियमवर आयोजित केलेल्या या स्पर्धेत आर्तुराने भारतीय पथकात महत्वाची भूमिका बजावली. तिने खेळाडूंच्या दुखापतींचे व्यवस्थापन केले. त्यांच्या पुनर्प्राप्तीला पाठिंबा दिला आणि खेळाडूंना सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी तयार केले. भारतीय संघांचे स्पर्धेपूर्वीचे प्रशिक्षण शिबीर 6 ते 12 जून या कालावधीत पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये झाले. भारतीय संघांचे प्रशिक्षक व्ही. राजशेखर आणि हेमांगिनी काळे यांच्या देखरेखेखाली आर्तूराने प्रत्येक खेळाडूचे योग्य मूल्यमापन केले तसेच त्यांना तंदुरूस्तीबद्दल अचुक मार्गदर्शनही केले. या स्पर्धेतील दोन्ही जेतेपदे मिळविताना भारतीय संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी विजय मिळविले. मुलींच्या संघाने निर्भेळ यश प्राप्त करताना अंतिम लढतीत यजमान केनियाचा 5-0 असा पराभव केला तर मुलांच्या संघाने केनियाचाच 5-1 असा पराभव केला व विश्वजेतेपदे हासिल केली.
सालसेत तालुक्यातील वार्का येथील थॉमस आंतोनियो दा कॉस्ता आणि लिबेराता ब्रिजिडा दा कॉस्ता यांची मुलगी असलेल्या आर्तुराचे शालेय शिक्षण मडगावच्या विद्या विकास अकादमीतून झाले. मेंगलोरातील डॉ. एम. व्ही. शेट्टी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथून फिजिओथेरपीमध्ये बॅचलर पदवी मिळवली आणि सध्या ती केएलई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीमधून स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ‘पहिल्याच ज्युनियर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेत भारतीय पथकाचा भाग असणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता, असे आर्तुरा म्हणाली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अशा प्रतिभावन तरूण खेळाडूंना पाठिंबा आणि मार्गदर्शन करणे तसेच त्यांना तंदुरूस्त ठेवणे, हे माझ्यासाठी समाधान देणारे होते. भारताचे प्रतिनिधीत्व करणे आणि जागतिक स्पर्धेत दोन राष्ट्रीय संघांच्या यशात योगदान देणे ही गोष्ट मी कायम माझ्यासोबत घेऊन जाईन, असे आपल्या अनुभवावर बोलताना आर्तुरा म्हणाली. आर्तुराने आता भारतीय खेळात स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्टची विकसित होत असलेली भूमिका देखील आपल्या कामगिरीने अधोरेखित केली आहे.
‘स्पोर्ट्स फिजिओथेरपीचा स्तर वेगाने वाढत आहे. प्रोफेशनल्स क्रीडापटूंसाठी तर आता स्पोर्ट्स फिजिओथेरपी आवश्यकच बनली आहे. आम्ही आता फक्त खेळाडूंच्या दुखापतींवरच उपचार करत नाहीत तर आम्ही प्रतिबंध, क्षेत्र व्यवस्थापन आणि खेळाडूंना दुखापतीपूर्वीच्या पातळीपर्यंत बरे होण्यास मदत करण्यावर काम करत आहोत. आम्ही खेळाडूंना प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देतो, जेणकरून त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीवर ते लक्ष केंद्रित करू शकतील. मला खरोखर आशा आहे की फिजिओथेरपीत प्रामुख्याने स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये अधिक तरूण फिजिओ, विशेषत: मुली, हे क्षेत्र किती प्रभावी असू शकते हे पाहतील आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहचण्याची आकांक्षा बाळगतील, असे आर्तुरा म्हणाली. तिच्या या प्रवासात तिला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना या पातळीवर कामगिरी करण्यासाठी अनुभव आणि आत्मविश्वासाची शिदोरी उपलब्ध करून दिल्याबद्दल तिने केएलई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी आणि आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन दिलेल्या मार्गदर्शकांचे मनापासून आभार मानले. ही संधी खरोखरच स्पप्नपूर्ती होती, असे आर्तुरा म्हणाली.
संदीप मो. रेडकर