चित्रकरांनी कुंचल्याच्या सहाय्यने चितारल्या कलाकृती
रंगबहार मैफल सुरांची कार्यक्रमात 20 कलाकारांचा सहभाग
श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्काराने श्रीकांत डिग्रजकर यांचा सन्मान
कोल्हापूर
रंग आणि कुंचल्याच्या सहाय्याने चित्रकारांनी व्यक्तीचित्र तर शिल्पकारांनी व्यक्तीशिल्प हुभेहुभ साकारले. कलाकारांनी साकारलेल्या कलाकृती पाहण्यासाठी रसिकांसह कलाकारांनी गर्दी केली होती. सुरांच्या मैफलिने कार्यक्रमाची उंंची वाढवली. चिमुकल्या कलाकारांनीही कॅन्व्हासवर रंग भरत आकर्षक निसर्गचित्रे साकारली, हे पाहून रसिकांनी सहभागी 20 कलाकारांसह चिमुकल्यांचे कौतुक केले.
रंगबहारच्या वतीने कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेन्टर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मैफल रंगसुरांची हा कार्यक्रम टाऊन हॉल येथे पार पडला. श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते ज्येष्ठ कला संघटक श्रीकांत डिग्रजकर यांना देवून गौरवण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. विजयमाला पेंटर, आदित्य बेडेकर, व्ही. बी. पाटील, इंद्रजीत नागेशकर धनंजय जाधव, संजीव संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालिया, सचिन सूर्यवंशी, युवा कलाकार यश दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. शरद भुताडीया म्हणाले, कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना चित्रकारांच्या मैफिलीत येण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. सर्व कलाकारांनी एकत्र येऊन कला चळवळ पुढे घेवून गेले पाहिजे. त्यासाठी समन्वय आणि प्रयत्न करण्याची गरज आहे. सत्काराला उत्तर देताना श्रीकांत डिग्रजकर म्हणाले, मला आत्तापर्यंत अनेक लोकांचे सहकार्य लाभले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. रंगबहार मैफिलीचे हे 48 वे वर्ष आहे. संस्थेची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरु आहे. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सूत्रसंचालन नागेश हंकारे यांनी केले. व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी रंगबहारचे अध्यक्ष धनंजय जाधव, संजीव संकपाळ, अमृत पाटील, प्रा. अजेय दळवी, विजय टिपुगडे, प्रा. मनोज दरेकर, प्रा. अभिजीत कांबळे, प्रा. मणिपद्म हर्षवर्धन, सुरेश मिरजकर, सुधीर पेटकर, विलास बकरे, सर्जेराव निगवेकर, अतुल डाके, राहुल रेपे, बबन माने, प्रा. गजेंद्र वाघमारे प्रा. प्रवीण वाघमारे, सर्वेश देवरुखकर, प्रा. शैलेश राऊत, प्रा. किशोर राठोड, विजय उपाध्ये, सुदर्शन वंडकर आदी उपस्थित होते.
मैफलीने रसिक मंत्रमुग्ध
केवलकुमार यांचे शिष्य रोहित फाटक यांनी शुद्ध सारंग गाऊन मैफिलीस प्रारंभ केला. त्यांनी सकल बन लाग रहे ही द्रुत विलंबित तीन तालातील बंदिश सादर केली. यानंतर त्यांनी तोडी रागातील तराना आणि दृतबंदीश तीन ताल सादर केला. पाठोपाठ मृग नयनी यार नवल रसिया ही होरी सादर केली. संत पुरंदरदास यांची कन्नडवचन हे भजन सादर केले. झपताल आणि तीन तालातील बंदिश गावून भैरवीने या मैफलीची सांगता केली. त्यांना प्रथमेश शिंदे, विनीत देशपांडे यांनी संगत केली. शशी शेखर यांनी तनपुरा, भारत पाटणकर यांनी तबला व संवादिनीवर साथसंगत केली.
चित्रमैफिलीत रंगांची उधळण
चित्रकार प्रा. बाळासाहेब पाटील यांनी अमूर्त शैलीतील कलाकृती साकारली. शिरीष देशपांडे बॉलपेनच्या साह्याने निसर्गचित्र रेखाटले, स्वाती साबळे अमूर्त शैलीतील कलाकृती साकारली. प्रा. अमित सुर्वे यांनी बबन माने यांचे व्यक्तिचित्र, प्रा. शितल बावकर अमृतशैलीतील कलाकृती, प्रा. योगेश मोरे यांनी संभाजी बनकर यांचे तर विवेक प्रभूकेळूस्कर यांनीही व्यक्तिचित्र रेखाटले. इनायत शिडवणकर त्यांनी निसर्ग चित्र, सुरेंद्र कुडपणे अमूर्त कलाकृती, प्रथमेश जोग निसर्ग चित्र, अशोक साळुंखे यांनी मालवणच्या किणाऱ्याचे निसर्ग चित्र, कशिश अडसूळने संकेत जाधव यांचे व्यक्तिचित्र, संदेश कांबळी यांनी कशिष पटेल यांचे सृजनात्मक व्यक्तिचित्र, सुबोध कांबळे यांनी राजेश कुंभार यांचे चारकोल मधील व्यक्तिचित्र, यश कातवरे यांनी वारानसी येथील निसर्ग चित्र, कुलदीप जठार व्यक्तिचित्र.
आकर्षक शिल्पकला पाहण्यासाठी गर्दी
शिल्पकार विशाल मसणे यांनी टाऊन हॉल संग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे यांचे व्यक्ती शिल्प, युवराज चिखलकर यांनी चित्रकार अरविंद वाघ यांचे व्यक्तिशिल्प, दिपक साळोखे यांनी कलाशिक्षक सागर बगाडे यांचे व्यक्ती शिल्प साकारले. शिल्पकलाकारांचे कौशल्य दिसतेच परंतू तीन तास एका ठिकाणी बसून शिल्प किंवा चित्र साकारण्यासाठी बसणाऱ्या मॅडेलचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे.