दैनंदिन भत्त्यातील वाढ खेळाडूंचे मनोबल वाढवेल
भत्ता आता 500 पर्यंत वाढण्याची शक्यता
भत्तावाढीने खेळाडूंना मिळेल पौष्टिक आहार
अहिल्या परकाळे
कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाने खेळाडूंना सुरूवातीला 20 रूपये दैनंदिन भत्ता मिळत होता, सध्या 350 भत्ता असून त्यात वाढ करण्याचा ठराव अधिसभेत मंजूर करण्यात आला. ही गोष्ट स्वागतार्ह आहे, परंतू प्रशासनाने इतर विद्यापीठाप्रमाणे महागाईनुसार दरवर्षी खेळाडूंच्या भत्त्यात वाढ करून सध्या 500 पेक्षा जास्त भत्ता देण्याची मागणी पुढे येत आहे.
शालेय जीवनापासूनच अनेक विद्यार्थी खेळात तरबेज असतात. अनेकांची परिस्थिती नसताना पाल्याच्या इच्छेखातर पालक कर्ज काढून क्रीडा स्पर्धेसाठी पाल्याला पाठवतात. खेळाडूंच्या विजयाने खेळाडूबरोबर कॉलेज व विद्यापीठाचे नाव राज्यासह देशाच्या नकाशावर कोरले जाते. खेळाडूंना लागणारे डायट, चहा, नाष्टा, जेवन, पोट भरून मिळाले तर ते स्पर्धेत चांगले खेळू शकतात. म्हणूनच विद्यापीठाने खेळाडूंच्या भत्त्यात दरवर्षी वाढ केली तर त्यांना स्पर्धेदरम्यान आरोग्याची काळजी घेता येईल. प्रशिक्षकांनाही योग्य त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत, अशी चर्चा आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेत खेळाडूंना ग्रेस गुण मिळाले पाहिजेत, यासाठी अनेकांनी आवाज उठवला. हा ठराव मंजूरही करण्यात आला. दुसरी अधिसभा स्थापन झाली तरी यावर अद्याप निर्णय घेतला नसल्याने नाराजीचा सूर आहे. क्रीडा स्पर्धांच्या वेळापत्रकानुसार नियोजन करून खेळाडूंच्या परीक्षा वेगळ्या घेतल्या जातात. ही खेळाडूंच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. खेळाडूंना सर्वोत्परी सुविधा देत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. परंत़ु मिळणाऱ्या भत्त्यात पौष्टिक आहार घेता येत नसल्याचे खेळाडू व प्रशिक्षकांचे म्हणने आहे. खेळाडूंना अनेक सुविधांसह आर्थिक मदत पुरवण्याची गरज आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेपासून दैनंदिन भत्त्यात झालेले बदल
विद्यापीठाच्या स्थापनेवेळी खेळाडूंना 20 रूपये भत्ता होता. काळानुरूप 60 वरून 80 अन् पाच वर्षापुर्वी 150 भत्ता तर अलीकडे 350 रूपये भत्ता दिला जातो. अधिकार मंडळांनी खेळाडूंच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळाडूंच्या अडचणी जाणून घेणची गरज
वर्षभरात विद्यापीठातील खेळाडू अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धांसाठी इतर राज्यांमध्ये जावून सुवर्णपदकही मिळवली. खेळाडू यश मिळवून आल्यानंतर विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने त्यांचा सत्कारही केला. परंतू येणाऱ्या अडचणी कोणीही जाणून घेतल्या नसल्याचे खेळाडूंचे म्हणने आहे. क्रीडा संचालकांनी खेळाडूंबरोबर येवून खेळाडूंना दिलासा द्यावा, अशी मागणीदेखील खेळाडूंकडून होत आहे.
खेळाडूंना सुविधा मिळण्यासाठी भत्त्यात वाढ आवश्यक
वरिष्ठ गटातील खेळाडू विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करतात. बाहेरगावी खेळायला गेल्यावर पौष्टिक आहार मिळावा, प्रवास व राहायची व्यवस्था चांगली होण्यासाठी विद्यापीठाच्या भत्त्यात वाढ होण्याची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब उलपे (प्राचार्य, केएमसी कॉलेज, क्रीडा प्रशिक्षक )