कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कृत्रिम बुद्धिमत्ता -उपयोग आणि आवश्यकता

06:33 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेल्या वर्षाअखेर म्हणजेच 2 ते 4 डिसेंबर 2024 दरम्यान बेलग्रेड येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आयोजित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा वैचारिक परिषदेचे आयोजन केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : उपयोग आणि त्याची व्यावसायिक आवश्यकता’ या विषयावर व्यापक चर्चा झाली. याचा पाठपुरवठा म्हणून केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान व उच्च शिक्षण विभागातर्फे 2025 वर्ष हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ वर्ष म्हणून पाळण्याचा व त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतल्याने या विषयाचे महत्त्व नव्या संदर्भात अधोरेखित झाले आहे.

Advertisement

 

Advertisement

याचाच एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून केंद्र सरकारच्या वाणिज्य, उद्योग व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता-सर्वांसाठी’ नावाचे अभिनव अभियान हाती घेण्यात आले आहे. यामध्ये केवळ उद्योग-व्यापार व व्यवसाय यांच्याशीच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रांना समाविष्ट करून घेतले जाणार आहे हे विशेष. यामध्ये मेट्रो-महानगरांपासून शहर-गाव व ग्रामीण क्षेत्राचा अंतर्भाव केला जाणार आहे. त्यामुळेच भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रचार-प्रसार व उपयोग करताना आरोग्य व वैद्यक सेवा, कृषी व संबंधित क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने विशेषत: ग्रामीण क्षेत्रात प्रभावी संवाद-संपर्क निर्माण करणे व वैद्यकीय सेवांसह विविध साधनांना बळकटी देणे इत्यादी शक्य होणार आहे.

यासंदर्भात कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित व नुकताच साध्य झालेला उपक्रम म्हणून ‘किसान-इ-मित्र’ चा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यामध्ये विविध भौगोलिक क्षेत्रातील व विविध प्रकारे आणि विविध प्रकारची शेती व फलोत्पादन, भाजीपाला लागवड, विविध प्रकारचे वातावरण, शेतजमीन व पर्जन्यमानासह करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट व संवादासह सल्ला-मार्गदर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, हे विशेष. मुख्य म्हणजे असा थेट सल्ला मिळण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड व तत्सम ओळखपत्र पुरेसे ठरणार असल्याने त्याच्या वापरामध्ये संबंधित शेतकऱ्यांना सुलभता लाभणार आहे. त्याशिवाय या पद्धतीला प्रशासनिक सुधारणेची जोड सुद्धा निश्चितच मिळेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे इच्छित व अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जी विशेष उपाययोजना केली आहे त्यामधील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे...

कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी क्षमता विकास :

उपाय योजना- कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक स्वरूपात वापर करण्यासाठी आवश्यक ते मूलभूत सुविधा तंत्रज्ञान व कौशल्य उपलब्ध करून त्याद्वारा क्षमता विकास साधणे.

कृत्रिम बुद्धिमत्तेला कल्पकतेची जोड :

उपाय योजना- कृत्रिम बुद्धिमत्तेला भारतीय व देशी शिक्षण-संशोधनाची जोड देण्यासाठी कल्पकतापूर्ण विकास केंद्रांची स्थापना करणे.

माहिती संचय संग्रहाचा प्रगत वापर :

उपाय योजना-संगणकीय पद्धती व माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगत कार्यपद्धतीचा विकास व वापर करणे.

कृत्रिम बुद्धिमत्तेची विकासाशी सांगड घालणे:

उपाय योजना- भारताची सध्याची विकसनशील स्थिती व नजिकच्या काळातील विकासाचा वेग याचा अद्ययावत ताळमेळ घालणे.

कौशल्य विकासात वाढ साधणे :

उपाय योजना-कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नव्या व प्रगतिशील कौशल्य विकासाला गतिमान करणे.

नवागतांना वित्तीय सहाय्य :

उपाय योजना- कृत्रिम बुद्धिमत्ता हे मुळातच नवे क्षेत्र असल्याने त्यामध्ये नव्याने प्रवेश करून काम करणाऱ्यांना स्टार्टअपच्या स्तरावर वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे.

सुरक्षित व विश्वासार्ह बनवणे :

उपाय योजना-प्रगत माहिती तंत्रज्ञान व संगणकीय पद्धती यांना संशोधनाची जोड देऊन कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला भारतात सुरक्षित व सर्वांसाठी विश्वासार्ह असे साधन बनवणे.

केंद्र सरकारच्या वरील प्रकारच्या विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांचे परिणाम योजनाकारांच्या मते पुढील प्रमाणे अपेक्षित आहेत.

आर्थिक क्षेत्रातील लवचिक स्वायत्तता: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा व्यापार-व्यवसाय पद्धती अधिक गतिमान होऊन त्याचा परिणाम उद्योग-व्यवसायाच्या आर्थिक प्रगतीच्या संदर्भात अधिक सकारात्मक व पूरक स्वरूपात होऊ शकतो. यातून या क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीला चालना मिळू शकते. कौशल्य विकासातून कर्मचारी व कामाचा विकास: नव्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी निगडीत क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाला मोठा वाव राहणार आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे 3.3 लाख जणांना या क्षेत्राशी निगडित कौशल्य विकासाचा लाभ झाला आहे. अशाप्रकारे कर्मचाऱ्यांच्या नव्या क्षेत्रातील कौशल्य विकासाचा लाभ कर्मचारी-कंपन्या या उभयतांना मिळत आहे.

सरकारचे धोरणात्मक निर्णय व त्याला उद्योग-व्यवसायांची सकारात्मक साथ यामुळे भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी निगडित क्षेत्रात आघाडी घेतली आहे. याचा पण आर्थिक व व्यावसायिक लाभ भारत आणि भारतीयांना होणार आहे. स्टॅनफोर्डच्या 2024 च्या अहवालात तर भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेचे मुख्य केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आरोग्य सेवेमध्ये विशेष सुधारणा :  कृत्रिम बुद्धिमतेद्वारा भारतातील वैद्यक क्षेत्र व रुग्णसेवा क्षेत्रात लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या जात आहेत. कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा क्षेत्रात घडून येणारे परिवर्तन मोठ्या अर्थाने लक्षणीय व परिणामकारक ठरणारे आहे.

देशांतर्गत आरोग्य क्षेत्रात प्रगत स्वरूपात व परिणामकारक बदल करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्था व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-कानपूर यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा विशेष प्रकल्प आणि प्रयत्न साकारला जात आहे. यातून रोग निदानापासून रोग नियंत्रणापर्यंत अनेक आव्हानांवर मात करण्यात येत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता व शिक्षण क्षेत्र :  सरकारचे नवे शैक्षणिक धोरण व त्याच्या अंमलबजावणीला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगाची परिणामकारक साथ मिळाली आहे. याचे दृश्य व सर्वात प्रमुख उदाहरण म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी द्वारा सोपा व दृकश्राव्य स्वरूपातील कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक विशेष अभ्यासक्रमांचा उल्लेख करावा लागेल. यातूनच कर्नाटकमध्ये ‘शिक्षा पायलट’ या अभिनव योजनेची सुरुवात होणे याचे श्रेयसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी संबंधित प्रयत्नांना जाते

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी व ग्रामीण विकास : भारत व भारताच्या आर्थिक-सामाजिक संदर्भात महत्त्वाच्या अशा कृषी व ग्राम विकास क्षेत्राला आता पूर्वापार प्रयत्नांच्या जोडीलाच कृत्रिम बुद्धिमत्तेची आता भक्कम व परिणामकारक साथ लाभली. यातूनच कृषी व ग्रामीण क्षेत्र अधिक उत्पादक व ग्रामीण क्षेत्रासाठी विविध प्रकारे लाभदायी ठरला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारा परिणामकारक प्रशासन: बदलता काळ, बदलत्या अपेक्षा व जनमानस यांचा योग्य ताळमेळ साधून परिणामकारक प्रशासन व्यवस्था साकारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर परिणामकारक ठरला आहे. यामुळे शासन-प्रशासन व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक होत आहे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

थोडक्यात म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवे क्षेत्र विकसित व अधिकाधिक प्रचलित-प्रचारित होत असल्याने त्याचे दृश्य व फायदेशीर परिणाम आता निश्चितपणे दिसू लागले आहेत. विकसनशील भारताची वेगाने विकसित होण्याची वाटचाल म्हणूनच  महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरते.

-दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article