कृत्रिम बुद्धिमत्ता : शाप की वरदान...
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हा सांप्रत काळातील परवलीचा शब्द आहे. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येकाच्या तोंडी आणि प्रत्येक व्यवहारात याचीच चर्चा ऐकू येते. असे असूनही हा नेमका काय प्रकार आहे, याची निदान भारतात तरी बहुतेकांना माहिती नाही. हे काहीतरी अद्भूत प्रकरण आहे, किंवा चमत्कार आहे, ज्याच्यायोगे अकल्पित असे काहीही घडविता येते, अशीची अनेकांची समजूत दिसते. त्यामुळे या अत्याधुनिक तंत्रज्ञानासंबंधी अनेक समज-अपसमज आहेत. देशाची आणि समाजाची भरभराट यामुळे होईल, असे काहीजण मानतात, तर या तंत्रज्ञानामुळे कामगार देशोधडीला लागतील, बेकारी प्रचंड प्रमाणात वाढेल, समाजात गोंधळ आणि अनागोंदी माजेल, अशी ठाम समजूत असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. हे सर्व टोकाचे समज किंवा अपसमज या तंत्रज्ञानाविषयीच्या अज्ञानामुळेच आहेत, हे स्पष्ट आहे. तेव्हा, हे तंत्रज्ञान, त्याची पार्श्वभूमी, उपयोग, दुरुपयोग, समाज आणि अर्थव्यवस्था यांच्यावर होऊ शकणारे याचे परिणाम आणि दुष्परिणाम टाळून याचा सदुपयोग करता येईल का, यासंबंधीचे हे संक्षिप्त विवेचन...
थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी
ड कृत्रिम बुद्धिमत्ता हे जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान मानले जात असले, तरी तत्वत: ते अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कोणतेही स्वयंचलित यंत्र हे खरेतर याच तंत्रज्ञानाचा भाग असते. अशी यंत्रे सहस्रावधी वर्षांपासून निर्माण करण्यात येत आहेत.
ड प्राचीन मानवाच्या कल्पनेतही हे तंत्रज्ञान होतेच. प्राचीन कथांमध्ये जे चमत्कार वर्णिले गेले आहेत, ते एक प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे कल्पनाविष्कार होते, असे म्हणता येते. त्यामुळे ही संकल्पना आधुनिक काळातील म्हणता येणार नाही.
ड मात्र, आधुनिक काळात, अर्थात 20 व्या शतकाच्या प्रारंभापासून या क्षेत्रात मोठे संशोधन झाल्याने त्याला मोठा उठाव मिळाला आहे. विविध प्रकारची स्वयंचलित यंत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती ही याच तंत्रज्ञानाची रुपे आहेत.
ड इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जशी वेगाने प्रगती होत गेली, तशी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची झपाट्याने उत्क्रांती होत गेली. आपला मोबाईल, संगणक, टॅब, वॉशिंग मशिन, कोणतेही यांत्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक साधन याच तंत्रज्ञानाचे अपत्य आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणजे काय ?
ड एखादी वस्तू. यंत्र किंवा साधन मानवाला हवी असणारी कामे मानवावर मोठ्या प्रमाणात अवलंबून न राहता, स्वत:च्या बळावर करीत असेल, तर अशा साधनाला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान असे म्हटले जाते. त्यादृष्टीने आपण आज उपयोगात आणत असलेली अनेक साधने याच श्रेणीतील असल्याचे दिसून येते.
ड कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांची निर्मिती अत्युच्च क्षमतेच्या आणि विविध प्रकारची कामे करण्याची क्षमता असणाऱ्या सेमीकंडक्टर्सच्या किंवा मायक्रोचिप्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोडण्या करुन केलेली असते. महासंगणक ज्याप्रमाणे काम करतो, तशाच प्रकारे ही साधने काम करतात, अशी माहिती दिली जाते.
ड कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे साधन माणसाच्या मेंदूप्रमाणे सारासार विचार सध्या करु शकत नसले, ती पुढच्या काळात अशा साधनांची निर्मिती होणे शक्य आहे. त्यावेळी मानवाचा मेंदू आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान यांचा संघर्षही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते. तथापि, ती अनाठायी आहे.
ड या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर मानवाचे नियंत्रण असते. कारण यंत्र किंवा साधन जरी त्याच्या स्वयंप्रेरणेने काम करत आहे, असे दिसत असले तरी ती प्रेरणा त्याला मानवानेच विशिष्ट प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून किंवा आज्ञांच्या माध्यमातून दिलेली असते. त्यामुळे त्याची ‘नाडी’ मानवाच्याच हातात आजवर तरी आहेच.
ड ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या शब्दप्रयोगाचा प्रथम उपयोग जॉन मेकार्थी या संशोधकाने प्रथम 1952 मध्ये अमेरिकेत केला. तेव्हापासून हा शब्द रुढ झाला आहे. त्याने त्यावर्षी या विषयावर डर्माउथ येथे एका कार्यशाळेचेही आयोजन केले होते. याचे हे कार्य हा शब्द आणि हे तंत्रज्ञान यांची पायाभरणी करणारे ठरले.
विकासाचे महत्वाचे टप्पे
ड कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचे आधुनिक काळातील 5 टप्पे आहेत. प्रथम 1900 ते 1950 या कालावधीतील आहे. दुसरा 1957 ते 1979 असा आहे. तिसरा 1980 ते 1987 या कालखंडातील आहे. चौथा 1990 ते 2010 असा असून पाचवा 2011 ते आतापर्यंतचा असा मानला जात आहे.
- प्रारंभीचा टप्पा (1900 ते 1950)
-1900 सालापासून कृत्रिम मानव या संकल्पनेची चर्चा बराच काळ होत होती. या संकल्पनेला त्यावेळच्या वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतले होते. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक तेव्हा, कृत्रिम मानवी मेंदू निर्माण करता येईल का, या विचाराने भारलेले होते. काही संशोधकांनी प्राथमिक अवस्थेतील ‘यंत्रमानव’ किंवा रोबो निर्माण केले होते. अर्थातच त्यावेळी हे तंत्रज्ञान अतिबाल्यावस्थेतच होते.
- अधिक प्रगतीचा टप्पा (1951 ते 1980)
-हा संगणक निर्मितीच्या प्रारंभाचा काळ आहे. संगणकाची निर्मिती कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा एक आश्चर्यकारक आविष्कार मानली जाते. संगणकाची निर्मिती तसे पाहिल्यास 1940 पासूनच केली जात होती. तथापि, त्यावेळी ती केवळ शास्त्रीय अभ्यासासाठी होती. मानवाने त्याच्या कामांसाठी उपयोग करावा, असे संगणक 1950 पासून निर्माण होऊ लागले. भारतातही 1957 मध्ये स्वदेशी निर्मितीच्या एका संगणकाची निर्मिती करण्यात आली होती, हे विशेष आहे.
-1950 मध्ये अॅलन टुरींग यांनी ‘काँप्युटर मशिनरी अँड इंटेलिजन्स’ संबंधात लेख प्रसिद्ध केले होते. हा संगणक निर्मितीतील निर्णायक बिंदू होता. याला ‘इमिटेशन गेम’ असे संबोधण्यात आले होते. 1952 मध्ये ऑर्थर सॅम्युएल याने ‘चेकर्स’ खेळण्यासाठी एका प्रोग्रॅमची निर्मिती करून ‘सॉफ्टवेअर’ची मुहूर्तमेढ रोवली होती. 1955 मध्ये जॉन मेकार्थी यांने कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द रुढ केल्यानंतर या तंत्रज्ञानाला याच संज्ञेने साऱ्या जगभरात ओळखले जाऊ लागले आहे.
- वयात येण्याचा कालावधी (1957 ते 1979)
-या साधारण 20 वर्षांच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वयात येऊ लागले. याच काळात त्याचा झपाट्याने विकासही झाला आणि त्याला अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागले. या काळात आकाराने सोयीस्कर आणि उपयोग करण्यास त्यामानाने सुलभ अशा संगणकांची निर्मिती झाली. अधिक वेगवान काम करणारे सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम्स निर्माण झाले. तथापि, याच काळात या तंत्रज्ञानासंबंधी अनेक शंका आणि भीतीही निर्माण झाली. 1975 च्या आसपास अमेरिकेच्या प्रशासनाने या तंत्रज्ञानाचा संशोधनासाठीचे आर्थिक साहाय्य सुरु ठेवण्यास अनुत्सुकता दर्शविली. त्यामुळे या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग मंदावला होता.
- भरभराटीचा कालावधी (1980 ते 2000)
-या कालावधीत हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने आकाराला आले आणि सर्वदूर पोहचले. त्याचे अनेक उपयोग आणि त्यामुळे होणारी सोय सर्वसामान्यांच्याही लक्षात येऊ लागल्याने या तंत्रज्ञानाची लोकप्रियता वाढली. हे तंत्रज्ञान शिकून घेण्याचे प्रमाण वाढले. अनेक विद्यापीठांमध्ये हा विषय प्राधान्याने शिकविला जाऊ लागला. नवी साधने, अधिक वेगवान आणि बलशाली संगणक, दूरसंचार साधने, दूरनियंत्रण साधने, अधिक प्रभावी यंत्रमानव निर्माण करण्याची जणू स्पर्धाच लागली. स्वयंपाक घरापासून रणांगणापर्यंत कोठेही या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला निर्णायक पुढावा देऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर अनेक देशांमध्ये त्याचा विकास करण्याची गळेकापू स्पर्धा प्रारंभ होण्याचाही हाच काळ आहे. अमेरिकेच्या ‘स्टारवॉर्स’ नामक संकल्पनेने या तंत्रज्ञानात अमेरिकेला जगाच्या पुढे नेले. आतापर्यंत केवळ ‘अॅकॅडेमिक’ असणारे हे तंत्रज्ञान व्यापारी लाभाचे बनले. त्यामुळे पुढच्या काळात त्याची उत्क्रांती कल्पनातीत वेगाने आणि विस्तृत प्रकारे झाली.
सांप्रतची स्थिती
ड एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून या तंत्रज्ञानाने जणू आपल्या जीवनाचा ताबा घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याच्यावाचून पान हलेनासे झाले आहे. 1990 नंतर जन्माला आलेल्या पिढीला तर या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साधनांची इतकी सवय झाली आहे, की पूर्वीचे लोक त्याच्यावाचून असे जीवन व्यतीत करीत असत, असा प्रश्न त्यांना पडतो. अवकाश संशोधन, औषध क्षेत्र, संरक्षण, शिक्षण क्षेत्र, वैज्ञानिक आणि तंत्रवैज्ञानिक संशोधन, क्रीडा, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिगत प्रशिक्षण, इतकेच नव्हे, तर साहित्य, संगीत, राजकारण, कला, संस्कृती, धर्म यांच्यापैकी कशालाही या तंत्रज्ञानाचे वावडे उरलेले नाही. किंबहुना, या तंत्रज्ञानावाचून चालणारच नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.
उत्सुकता आणि वादग्रस्तताही...
ड आजच्या समाजाला या तंत्रज्ञानासंबंधी अतीव उत्सुकता आहे. तसेच वादग्रस्तताही निर्माण झाली आहे. या तंत्रज्ञानाचा सदुपयोग केल्यास अनेक क्षेत्रांमध्ये आश्चर्यकारक प्रगती होऊ शकेल. विशेषत: ज्या संशोधन क्षेत्रांमध्ये अनेक प्रयोग करावे लागतात, त्या प्रयोगांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे संशोधनावर केल्या जाणाऱ्या खर्चात मोठी कपात होऊ शकते. तसेच संशोधन वेगवान आणि अचूक होण्यास या तंत्रज्ञानाचे निश्चितच मोलाचे साहाय्य होईल हे सर्वजण मान्य करतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा प्रभाव, सामर्थ्य आणि उपयुक्तता यांच्याविषयी कोणीही शंका उपस्थित करत नाहीत. तसेच भविष्यकाळात या तंत्रज्ञानावाचून चालणार नाही. ते टाळता येणार नाही, याची खूणगाठ प्रत्येकाने बांधली आहे.
प्रमुख चिंता दुरुपयोगाची...
ड या तंत्रज्ञानासंबंधीची प्रमुख भीती त्याच्या दुरुपयोग होण्याच्या शक्यतेत दडली आहे. ज्या दोन किंवा अधिक व्यक्ती आयुष्यात एकमेकांना भेटल्याही नाहीत, किंवा एकमेकांशी बोललेल्याही नाहीत, अशा व्यक्ती एकमेकांशी संवाद करताना किंवा आणखी काही करतानाही दिसू शकतील, असा आभास निर्माण करण्याची राक्षसी शक्ती या तंत्रज्ञानात आहे. ‘डीपफेक’ या याच तंत्रज्ञानाच्या घातकी अवतारात कित्येकांना जीवनातून उठविण्याचीही क्षमता आहे. अफवा पसरवून गोंधळ निर्माण करणे, राजकीय किंवा आर्थिक प्रतिस्पर्ध्यांना प्रभावी अपप्रचाराच्या माध्यमातून नामोहरम करण्याचा प्रयत्न करणे, इतरांच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करणे, इतरांच्या खासगीत्वात ढवळाढवळ करणे, इत्यादी अनेक दुष्कृत्ये या तंत्रज्ञानाचा माध्यमातून केली जाऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. हे किंवा असे दुरुपयोग कठोरपणे रोखले गेले नाहीत, तर हे तंत्रज्ञान अतिशय घातक शापही ठरु शकते. त्यामुळे सावधानता बाळगणे महत्वाचे आहे.
दुरुपयोग टाळण्यासाठी काय आवश्यक...
ड कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणजे काय यासंबंधी सर्व लोकांचे प्रबोधन होणे ही प्रथम आवश्यकता आहे. या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कसा, किती आणि कोठे करण्यात येऊ शकतो, याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
ड आपल्याला कोणतेही व्हिडीओ चित्रण किंवा रेकॉर्डेड आवाज किंवा संवाद ऐकविण्यात आला तरी त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. कारण तो या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करुन निर्माण करण्यात आलेला आभास असू शकतो.
ड या तंत्रज्ञानावर कोणताही देश, संस्था, कंपनी किंवा व्यक्ती यांचा एकाधिकार असता कामा नये. हे तंत्रज्ञान ओपन सोर्सकोडच्या माध्यमातून उपलब्ध असणे आवश्यक आहे. तशी व्यवस्था जगभरात निर्माण होणे आवश्यक आहे.
ड या तंत्रज्ञानाचा उपयोगासंबंधी जागतिक पातळीवर सर्वमान्य नियम आणि निकष निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघासारख्या जागतिक संस्थांनी पुढाकार घेण्याची आवश्यता आहे. नियमांचे कठोर क्रियान्वयनही आवश्यक आहे.
संकलन - अजित दाते