महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कलोपासक

06:59 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपटांचा नवा प्रवाह निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ  दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे एका आशयघन आणि समृद्ध सिनेपर्वाचीच समाप्ती झाली आहे. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यातून वास्तवाचे दर्शन घडावे आणि प्रेक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी, असा वेगळा विचार करणाऱ्या दुर्मीळात दुर्मीळ दिग्दर्शकांमध्ये बेनेगल यांच्या नावाचा समावेश होतो. सत्यजित राय आणि मृणाल सेन या महान दिग्दर्शकांनी भारतीय चित्रसृष्टीला विशिष्ट चौकटीतून बाहेर काढत समांतर चित्रपटांची नवी वाट मोकळी करून दिली. ही वाट अधिक प्रशस्त करण्याचे काम कुणी केले असेल, तर श्याम बेनेगल यांनी. बेनेगल यांनी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट शैलीला एकत्र आणणारा मध्यम मार्ग चोखाळला आणि थबकलेल्या समांतर चित्रपट चळवळीला नवी दिशा दाखवली, हे त्यांचे प्रमुख योगदान होय. बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल. त्यांचा जन्म हैदराबादचा. त्यांचे वडील श्रीधर बेनेगल स्वत: एक छायाचित्रकार होते. त्यांच्याकडूनच बेनेगल यांच्यावर कलोपासनेचे संस्कार झाले. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. त्यांच्या या छंदाला कुटुंबियांनीही प्रोत्साहन दिले. त्याकाळी प्रभात, मेहबूब आणि न्यू थिएटरसारख्या स्टुडिओंनी निर्माण केलेले चित्रपट त्यांच्या कुटुंबातील सारे सदस्य आवडीने पहात असत. त्यामुळे बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला. उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवल्यानंतर ते मुंबईमध्ये लिंटास या मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये कॉपिरायटर म्हणून काम करू लागले. त्यावेळी अनेक जाहिराती आणि लघुपट बनवताना चित्रपटाच्या तांत्रिक अंगांचा त्यांना भरपूर अनुभव मिळाला. 1962 मध्ये त्यांनी गुजरात सरकारसाठी महिसागर धरणाची माहिती देणारा घेर बेठा गंगा हा गुजराती भाषेतील पहिला लघुपट बनवला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील ‘फिल्म अँड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ येथे काही काळ अध्यापनाचेही काम केले. 1970 ते 1972 दरम्यान श्याम बेनेगल यांना ‘होमी भाभा अधिछात्रवृत्ती’ मिळाली आणि त्या अंतर्गत त्यांनी न्यूयॉर्क आणि बोस्टन येथील लहान मुलांशी संबंधित दूरदर्शन क्षेत्रातही काम केले. भारतात परतल्यानंतर त्यांनी 1974 मध्ये ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. भारतीय सिनेजगतात या चित्रपटाने नवा मानदंड निर्माण केला. बेनेगल यांच्यावर तऊणवयात आंध्रप्रदेशात त्याकाळी सुरू असलेल्या तेलंगणा राज्यनिर्मिती चळवळीचा मोठा प्रभाव पडला होता. यातूनच एक सर्वसमावेशक सामाजिक आणि वैचारिक बैठक त्यांच्या मनात तयार झाली होती. त्याचा आविष्कार म्हणजे हा चित्रपट होय. अंकुर चित्रपटात त्यांनी सरळ साध्या कथेतून ग्रामीण भारतातील जातीयता, वर्गवर्चस्व आणि स्त्री-पुऊष भेदाभेद यामुळे निर्माण झालेली मानवी मनाची गुंतागुंत सादर करीत प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले. अंकुरचे बरेच कौतुक झाले आणि चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटात शबाना आझमी आणि अनंत नाग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यातील शबानाची भूमिका अजरामर झाली. त्यातून कलात्मक अभिनेत्री म्हणून तिचा उदय झाला, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. अंकुरनंतर आलेल्या निशांत (1975) आणि मंथन (1976) या चित्रपटांतूनही त्यांनी ग्रामीण सामाजिक जीवनाचा पट उलगडून दाखवला. याचबरोबर चरणदास चोर, भूमिका, कोंदुरा, जुनून, कलयुग, आरोहण, मंडी, त्रिकाल, सुसमन, अंतर्नाद, सूरज का सातवा घोडा, मम्मो, सरदारी बेगम यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. चित्रपटासारख्या माध्यमातून सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडणे, हे बेनेगल यांचे वैशिष्ट्या होते. शबाना आझमी, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसऊद्दिन शहा, अमरिश पुरी, कुलभूषण खरबंदा अशा आर्ट कलाकारांना घडविण्यातही त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे दिसते. चित्रपटाबरोबरच दूरदर्शनकरिता यात्रा, कथासागर, भारत एक खोज आदी मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. त्यातूनही त्यांचा वेगळा दृष्टीकोन प्रतिबिंबित झाला. तर महात्मा गांधी, सुभाषबाबू यांच्यावरील चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्यही त्यांनी पेलून दाखवले. समाजव्यवस्थेपासून बाहेर फेकल्या गेलेल्या व्यक्ती आणि समुदायांच्या कथा त्यांनी प्रामुख्याने मांडल्या आणि याद्वारे मानवतावादी दृष्टिकोन उजागर करण्याचा प्रयत्न केला. सध्या चित्रपट निर्माण करण्यासाठी प्रचलित असलेली ‘क्राऊड फंडिंग’ ही संकल्पना त्यांनी 1976 सालीच मंथन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरली होती. त्यावेळी गुजरातमधील 5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्येकी 2 ऊपये वर्गणी काढून त्यांचीच गोष्ट सांगणारा हा चित्रपट निर्माण केला होता. याशिवाय देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित राय यांच्या जीवनावरील उत्तम लघुपटांची निर्मिती बेनेगल यांनी केली. आपल्या कारकिर्दीत महत्त्वाच्या 24 चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या बेनेगल यांना मानाच्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’सह ‘पद्मश्री’ (1976) आणि ‘पद्मभूषण’ (1991) व अन्य पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा त्यांचा विक्रम होय. बेनेगल यांना जवळपास आठ चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यातूनच त्यांची दिग्दर्शकीय उंची लक्षात येते. खरेतर चित्रपट हे आजही केवळ मनोरंजनाचे वा टाईमपासचे साधन म्हणून ओळखले जाते. मात्र, चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील वास्तव, तळातील घटकांचे प्रश्न, त्यांच्या जगण्यातील आव्हाने याचे दर्शन बेनेगल यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी समाजमनास घडवले. त्यामुळे बेनेगल यांच्या चित्रपटांचा उल्लेख बॉलिवूडचा अर्क, असा करावा लागेल. समांतर चित्रपटाच्या या जनकास भावपूर्ण आदरांजली.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article