महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कलेचे शिक्षण

06:31 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पु. ल. देशपांडे एकदा म्हणाले आहेत, “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्या, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” म्हणूनच वेगवेगळ्या कलांची ओळख होणे आवश्यक आहे. “रिटायर झाल्यावर मी माझे छंद जोपासणार आहे”, अशी मनोवृत्ती अंगीकारल्यास आयुष्यभर कोणत्याही कलेची तोंडओळख होत नाही. विविध कलांची तोंडओळख केव्हा करून घ्यावी? अर्थातच शालेय जीवनात. परंतु या काळामध्ये सहसा पालक-शिक्षकांचा दृष्टीकोन परीक्षेत गुण मिळवण्याकडे असतो. परीक्षेत मिळणाऱ्या टक्केवारीच्या पलीकडे पालकांनी विचार आणि प्रयत्न केल्यास शालेय जीवनात मुला-मुलीचे आयुष्य समृद्ध करण्याची संधी मिळते. त्यासाठी शालेय जीवनात किमान एक-दोन कला आस्वादकाच्या भूमिकेतून शिकवण्याची संधी पालकांनी उपलब्ध करून द्यावी.

Advertisement

शाळेमध्ये चित्रकला शिकवली जाते ती मार्क मिळवण्यासाठी. त्यामुळे कलेचे शिक्षण बाजूला राहते आणि स्थूल चित्रे काढली जातात. चिंटूसारखे कोणतेही चित्र असो वा आवडती कार असो, दिसेल त्याचे चित्र काढणे ही एक कला शिकण्याची दुसरी पायरी आहे. तत्पूर्वी चित्रे वाचण्याची सवय अंगी बाणावी लागते. चित्रे वाचायला शाळेत शिकवले जात नाही. चित्रांचे वेगवेगळे प्रकार कोणते, विविध चित्रकार चित्रे कशी काढतात, वृत्तपत्रामध्ये लेखास अनुसरून चित्रे काढताना कल्पकतेने कसा विचार केला आहे असे विविध प्रश्न पडावेत आणि त्या दृष्टीने चित्र बघावे. याकरिता पाल्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर पालकांनी विविध प्रकारच्या चित्रकला प्रदर्शनाला घेऊन जाणे आवश्यक ठरते. वेगवेगळ्या चित्रकारांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ते चित्रकार चित्र काढतात त्यावेळी ती प्रक्रिया बघता बघता मुले चित्रे वाचायला शिकतात. त्यानंतर मुले चित्रे आपापल्या समजुतीनुसार काढतात. चित्रे काढताना त्यावर बंधने घालणे गैर आहे. पालक वेगळा दृष्टीकोन देण्याचे काम करू शकतात.

Advertisement

हत्ती एकाच बाजूने न काढता पुढून कसा दिसेल, मागून कसा दिसेल, इमारत वेगवेगळ्या कोपऱ्यातून आणि वेगवेगळ्या मजल्यावरून कशी दिसेल असे प्रश्न विचारून तशी चित्रे काढण्यास प्रवृत्त करता येते. सूचना करणे आणि प्रश्न विचारून विचारांना चालना देणे यामध्ये फरक आहे.

शिल्पकला शिकण्याची पहिली पायरी म्हणजे मातीचे वेगवेगळे आकार तयार करणे.  खरे तर बालवयामध्येच मातीचे वेगवेगळ्या आकाराचे गोळे तयार केले तर हाताच्या बोटांचा उत्तम व्यायाम होतो, हाताला ‘वळण’ चांगले लागते. परंतु अलीकडे शहरी मुलांना मातीमध्ये खेळू दिले जात नाही. त्यांचा मातीशी संबंध कमीत कमी येण्याला पालक जबाबदार आहेत. याकरिता लहान वयामध्ये ‘शेती पर्यटन’ करणे आवश्यक ठरते. त्या पर्यटनामध्ये मातीमध्ये बिनधास्त खेळावे आणि खेळू द्यावे. ‘सो मच मड’ अशी ‘इंटरनशनल स्कूल’ची मानसिकता ठेवल्यास शिल्पकला कशी येणार? गणेशोत्सवापूर्वी घरच्या घरी गणपती तयार करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करता येईल. ‘गणपती’ करता करता मुलांकडून ‘मारुती’ झाला तरी त्याचे ‘पाप’ लागत नाही.

नाट्या

विविध नाटके नाट्यागृहामध्ये जाऊन मुलांना दाखवण्याची जबाबदारी पालकांची आहे. कलांची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची सवय आयुष्याला वेगळे वळण लावणारी ठरते. व्यावसायिक, प्रायोगिक, ऐतिहासिक, सामाजिक, विनोदी अशा अनेक प्रकारची नाटके विविध प्रकारच्या नाट्यागृहामध्ये जाऊन बघितल्यास त्या कलेची तोंडओळख होते. त्यानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनात हिरीरीने भाग घेऊन नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यास अंगभूत बुजरेपणा जातो, लहान वयामध्येच देहबोलीमध्ये अमुलाग्र बदल घडू शकतो, सभाधीटपणा वाढतो. कला आणि कला आस्वाद शिकणे म्हणजे रियलिटी शोमध्ये आपल्यापाल्याला पाठवणे नव्हे.

संगीत

अलीकडेच एका लहान मुलांच्या शाळेमध्ये सर्व मुलांना वेगवेगळी गाणी ऐकवून त्याची लय कशी ओळखायची याचा तास घेत असताना शाळेमध्ये लावलेली गाणी ऐकून बाहेर उभे असलेल्या पालकांनी शिक्षकांना विचारले, “शाळेच्या स्नेहसंमेलनाची प्रॅक्टीस सुरु आहे का?” याचाच अर्थ शाळेमध्ये संगीत वर्षभर ऐकवले जात नाही आणि काही समारंभ असेल तरच ऐकवले जाते, ही पालकांची दृढ समजूत झाली आहे. संगीत शिकणाऱ्या मुलांनी ठराविक मार्क मिळवण्यासाठी किंवा संगीत विशारद होण्यासाठी संगीत शिकण्यापेक्षा वेगवेगळ्या काळातील गाणी ऐकायला शिकावे, वेगवेगळ्या देशातील संगीत प्रकारांचा परिचय व्हावा, अनेक वाद्ये बघून ऐकायला शिकल्यावर संगीत ऐकून त्यामध्ये वाजलेली वाद्ये कोणती आहेत, हे ओळखता आले तर संगीत शिकण्याची पुढची पायरी गाठली असे समजावे. मुला-मुलीनी अनेक वाद्ये ऐकल्यावर त्यामधील एखादे वाद्य वाजवण्यास शिकणे अधिक योग्य आहे. परंतु आजही अनेक पालक “मला तबला शिकता आला नाही, तू शिक” असे मुलांना सांगतात आणि मुलगी असल्यास तिला नृत्याच्या क्लासला पाठवतात. आपल्या सुप्त इच्छा मुलांवर लादून संगीत शिक्षण होत नसते. त्यासाठी पालकांनी मुलांच्या बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या संगीत मैफिलींचा आस्वाद घ्यायला हवा.

नृत्य शिकण्यासाठी वेगवेगळ्या नृत्य प्रकारांचा परिचय करून घेणे, मैफिलींचा अनुभव घेणे, लय-तालाचे ज्ञान असणे अशा अनेक पायऱ्या आहेत. रियॅलिटी शो मध्ये भाग घेण्यासाठी नृत्याच्या क्लासला नाव घातल्यामुळे नृत्य कलेमध्ये पारंगत होता येत नाही. नृत्य करण्यासाठी लय-तालाच्या ज्ञानाबरोबरच अभिनय करण्याचे कौशल्य शिकून घ्यावे लागते. कोणतेही नृत्य संगीतावर केले जाते त्यामुळे संगीत शिकण्याला पर्याय नाही. घरामध्ये कोणीही वैविध्यपूर्ण गाणी ऐकत नसेल तर नृत्य शिकण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. ज्यांच्या घरामध्ये वेगवेगळे संगीत प्रकार नियमितपणे ऐकले जातात, त्या घरामध्ये लय-ताल शिकणे कमी कष्टप्रद होते.  दिवाळीच्या सुट्टीमध्ये कथ्थक आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बॉलीवूड डान्स असे पालकांचे धरसोडीचे धोरण असू नये.

चित्रपट

देशो-देशीचे चित्रपट बघितल्यामुळे त्या देशांच्या संस्कृतीची ओळख होते.  इतिहास दृश्य स्वरूपात बघण्यासाठी चित्रपट बघण्याचे वेड लागणे चांगलेच आहे.  अनेक खेळाडू, कलाकार, नेते यांच्या जागतिक बायो-पीक बघितल्यावर प्रत्येक देशाच्या संस्कृतीप्रमाणेच तिथल्या आर्थिक सामाजिक स्थितीचे भान वाढते.  कोणतीही भाषा शिकण्याची पहिली पायरी म्हणजे भाषा ऐकणे. सब-टायटल वाचता वाचता इंग्रजी चित्रपट बघण्याचा नाद लागल्यामुळे इंग्रजी भाषा सुधारण्यास मदत होते कारण इंग्रजी ऐकले जाते. आठवड्यातून एक उत्तम चित्रपट सह-कुटुंब बघितल्यास त्या मुलांना कार्टून बघण्याची गरज भासणार नाही. कला शिकल्यामुळे सर्जनशीलता वृद्धिंगत होते, मुलांचा लक्ष केंद्रित करून कोणतीही कृती करण्याचा कालावधी वाढतो, मुलांना स्वत:चे मत व्यक्त करण्याची संधी मिळते, मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने काही घडवणे ही भावना वाढीस लागते. कला शिकणे याचा अर्थ कलाकार होण्यासाठीच शिकणे हा एक रूढ गैरसमज आहे. या कलांकडे जीवन कौशल्य स्वरूपात बघावे. तबला/तालवाद्य शिकल्यास गणिताचा उत्तम रियाज होऊ शकतो. आर्किटेक्ट किंवा डिझायनर होण्यासाठी चित्रकला, शिल्पकला शिकण्याचा नक्कीच उपयोग होतो. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दोन मार्क मिळवण्यासाठी संगीत शिकल्यामुळे कलेचा दृष्टीकोन विकसित होत नाही. मार्क मिळवण्यासाठी शालेय विषय पुरेसे आहेत. आयुष्य समृद्ध होण्यासाठी विविध कला शिकाव्यात आणि पालकांनी मुलांना त्या कला शिकण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून द्याव्यात. विविध कलांचा आस्वाद कसा घ्यावा, चित्र कसे पहावे, संगीत कसे ऐकावे, चित्रपटाचा रसास्वाद कसा घ्यावा, कथक, कथकली आणि भरतनाट्याम या नृत्य प्रकारांमध्ये फरक काय आहे अशा प्रश्नांचा मागोवा पालकांनी मुलांबरोबर विविध मैफीलीमध्ये हजेरी लावून घेतला तर मुलांचे आयुष्य समृद्ध होईल.

सुहास किर्लोस्कर

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article