अर्शिन कुलकर्णीचे दमदार शतक
वृत्तसंस्था/ चंदीगड
2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारपासून सुरू झालेल्या इलाईट ब गटातील सामन्यात अर्शिन कुलकर्णीचे दमदार शतक तसेच पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने पंजाबविरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 275 धावा जमविल्या.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी या सलामीच्या जोडीने 38.1 षटकात 144 धावांची शतकी भागिदारी केली. शॉने 117 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 74 धावा झळकाविल्या. महाराष्ट्रची ही सलामीची जोडी फुटल्यानंतर त्यांचे आणखी दोन फलंदाज लवकर बाद झाले. सिद्धेशवीर 11 धावांवर तर सचिन धस 2 धावांवर तंबूत परतले. कर्णधार अंकित बावणेने 3 चौकारांसह 23 धावा झळकाविल्या. अर्शिन कुलकर्णीने 2 षटकार आणि 15 चौकारांसह 133 धावा झळकाविल्या. तो पाचव्या गड्याच्या रुपात बाद झाला. सौरभ नवले 13 धावांवर तर घोष 12 धावांवर खेळत आहे. दुखापतीमुळे सक्सेनाने आपले खाते उघडण्यापूर्वीच मैदान सोडले. पंजाबतर्फे गुरनुर ब्रार आणि मयांक मार्कंडे यांनी प्रत्येकी 2 तर हरप्रीत ब्रारने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - महाराष्ट्र प. डाव 5 बाद 275 (अर्शिन कुलकर्णी 133, पृथ्वी शॉ 74, बावणे 23, गुरनुर ब्रार व मार्कंडे प्रत्येकी 2 बळी).