‘कडकलक्ष्मी’चे शहरात आगमन
बेळगाव : वाद्याचा आवाज करत आपल्या हातातील चाबकाने जोरजोरात स्वत:भोवती फटकारे मारत गल्लोगल्ली फिरणाऱ्या ‘कडकलक्ष्मींचे’ दर्शन अलीकडे दुर्मीळ झाले आहे. परंतु आजही काही ठिकाणी अवचित त्यांचे दर्शन घडते. त्यांच्या हातात आज चाबूक राहिला नाही. परंतु डमरू वाजवत देवीच्या नावाने जयघोष करत तिची मूर्ती घेऊन दारोदार भ्रमंती करत ‘कडकलक्ष्मीचे’ दर्शन घडविणारे लोक आजही दिसतात. ‘कडकलक्ष्मी’ म्हणजेच कानडीमध्ये ‘दुर्ग मुरगव्वा’ ही लोक परंपरा आजही शहराबरोबरच खेडोपाडी पाहायला मिळते. सध्या गोकाकहून आलेले विठ्ठल ‘कडकलक्ष्मी’ घेऊन फिरत आहेत.
कंबरेला विविधरंगी कापडापासून तयार केलेला पोषाख (जो साधारण स्कर्टप्रमाणे दिसतो), कपाळावर हळद आणि कुंकवाने भरलेले मळवट आणि हातात वाद्य वाजवत ते फिरत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची दहाव्या इयत्तेत शिकत असलेली मुलगी व चौथीत शिकत असलेली नात आहे. पूर्वी तुमच्यासोबत हातात चाबूक असे, आज तो का दिसत नाही? या प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिले ते मार्मिक तर होतेच पण मिश्किलही होते. त्यांच्या मते आता चाबूक गोलाकार फिरवावा एवढी जागा गल्लीमध्ये आणि शहरामध्ये पाहायला मिळत नाही. पूर्वी ‘कडकलक्ष्मी’ आल्यास लोक पायावर पाणी घालून देवीचे दर्शन घेऊन जमेल तशी धान्ये व पैशाच्या स्वरुपात मदत करत असत. आता धान्य कोणी देत नाही, मात्र कमी प्रमाणात का होईना, पाच-दहा रुपये नक्कीच देतात, असे ते म्हणाले.