For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जंगलातून रात्रीच्यावेळी हत्तीचे आगमन

10:32 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
जंगलातून रात्रीच्यावेळी हत्तीचे आगमन
Advertisement

शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण, पिकांचे नुकसान, फॉरेस्ट खात्याने लक्ष देणे गरजेचे, सतर्कतेची गरज

Advertisement

वार्ताहर /उचगाव

सोमवारी रात्री महिपाळगड, देवरवाडी या जंगलातून खाली उतरून बसुर्ते गावाच्या दिशेने उतरत उचगाव, गोजगे शेतवडीतून पुन्हा बेकिनकेरे, अतिवाड यामार्गे याच जंगलात हत्ती गेला असावा. याच दरम्यान शेतात रात्रीचा विद्युत पुरवठा सुरू असल्याने अनेक शेतकरी पिकांना पाणी देऊन घरी परतल्याक्षणीच म्हणजे रात्री साडेबारा ते एकच्या सुमाराला सदर हत्ती या भागातून गेल्याने शेतकरी वर्गाचे जीव बालंबाल वाचल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक नागरिकांनी रात्री या हत्तीला पाहिले, तर नारळाचे, पपईचे झाड उपटून व शेतवडीतील ऊस, मका अशा पिकांचे नुकसान करत सदर हत्ती गेल्याने, या घटनेने या संपूर्ण भागात भीतीचे वातावरण शेतकरी वर्गात आणि नागरिकांमध्ये पसरले आहे. महिपाळगड, देवरवाडीकडून सदर हत्ती खाली उतरला आणि बसुर्ते गावाकडून येताना सुबोध कदम यांच्या फार्महाऊसमध्ये शेतवडीतील नारळाचे झाड उपटून टाकण्याचा आवाज त्यांना येताच त्यांनी उठून पाहिले. मात्र या हत्तीला घाबरून त्यांनी पुन्हा दरवाजे बंद करून घेतले. पुढे उचगावच्या शेतवडीच्या दिशेने येताना रस्त्यालगत असलेल्या डोंगराच्या परसामध्ये असलेल्या हौदातील पाणी पिण्याचे त्यांनी गच्चीतून रात्री 12.45 वा.च्या सुमाराला पाहिल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सदर हत्ती पुढे जात बळवंत उर्फ बंटी पावशे, किशोर पावशे यांच्या बागेतून मक्मयाच्या पिकात घुसून मक्मयाचे, उसाचे बरेच नुकसान या ठिकाणी केल्याचे बंटी पावशे यांनी सांगितले.

Advertisement

बंटी पावशे हे शेतामध्ये पिकाला पाणी देत होते. ते रात्री 12.45 च्या सुमाराला घरी आल्यानंतर एक वाजून पाच मिनिटाच्या सुमाराला शेतवडीत काहीतरी आवाज येत असल्याने त्यांनी प्रखर बॅटरीच्या प्रकाशात पाहिले. पण अंधुक प्रकाशामुळे त्यांना हत्तीचे खरोखर दर्शन झाले नाही. मात्र या हत्तीने चिकूचे झाड उपटून टाकले. यावेळी बंटी पावशे, किशोर पावशे व इतर त्यांचे बंधू यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. पण सदर हत्तीचा सुगावा लागल्याने त्यांनी बाहेर येण्याचे टाळले. वृक्षांना धडक देण्याचे आवाज मात्र त्यांनी ऐकले. पुढे राजू तरळे यांच्या उसामध्ये सदर हतीने उसाचे बरेच नुकसानही केल्याचे सांगण्यात येत होते. तसाच हत्ती योगेश गिरी, होनगेकर यांच्या शेतवडीतून गोजगेमार्गे तो पुढे बेकिनकेरे, अतिवाड या गावांच्या शेतवडीतून याच दिशेने पुन्हा डोंगरात गेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर हत्ती आल्याचे वृत्त तातडीने उचगाव ग्रा. पं. सदस्य बळवंत उर्फ बंटी पावशे यांनी फॉरेस्ट ऑफिसरना कळविले. सदर फॉरेस्ट ऑफिस खात्याचे अधिकारी रेंज फॉरेस्ट ऑफिसर पुऊषोत्तम रावजी, डेप्युटी रेंज फॉरेस्ट ऑफिसर रमेश गिऱ्यापन्नावर, बीट फॉरेस्टर राहुल भोंगाळे, बीट फॉरेस्टर जे. बी. रजपूत, बीट फॉरेस्टर सुदर्शन कोलकार यांनी तातडीने या भागात येऊन पाहणी केली व सर्व नागरिकांना सूचना केल्या. मंगळवारी रात्री थोडा पहारा करून या भागात पुन्हा हत्ती येईल यासाठी सर्वांनी सावध राहण्याचा शेतकरी व नागरिकांना इशारा दिला आहे. हत्ती आल्याच्या घटनेने या संपूर्ण भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून फॉरेस्ट खात्याने त्वरित हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

सावध राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

उचगाव परिसरात हत्ती आल्याने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन वनखात्याने केले आहे. शिवाय परिसरातील वीजपुरवठा रात्रीचा बंद ठेवावा. केवळ दिवसा वीज पुरवठा करावा, असे पत्र वनखात्याने हेस्कॉमला पाठवले आहे.

Advertisement
Tags :

.