For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एम. व्ही. राव कंपनीच्या संचालकांना अटक करा

12:28 PM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
एम  व्ही  राव कंपनीच्या संचालकांना अटक करा
Advertisement

दोघांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेसची मागणी : दहा दिवसांची मुदत, अन्यथा घेरावाचा इशारा

Advertisement

पणजी : वास्को येथे उड्डाणपूल बांधकामादरम्यान दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एम. व्ही. व्यंकटराव इफ्रा या कथित ‘सरकारी जावई’ कंपनीवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद करावा, त्यांच्या सर्व संचालकांना अटक करावी आणि या कंपनीकडून राज्यात विविध भागात सुरू असलेली बांधकामे त्वरित थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. येत्या दहा दिवसांच्या आत ही कारवाई न झाल्यास पोलिसस्थानकावर मोर्चा नेऊन घेराव घालण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मंगळवारी पणजीत काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, शरद चोपडेकर, नंदादीप राऊत आणि वसंत नाईक यांची उपस्थिती होती.

ही कंपनी म्हणजे सरकारी जावई 

Advertisement

पुढे बोलताना पाटकर यांनी सांगितले की, सदर एम. व्ही. व्यंकटराव इफ्रा कंपनी म्हणजे सरकारी जावई बनली आहे. त्यातूनच पेडणेपासून काणकोणपर्यंत त्यांची अक्षरश: मनमानी आणि मक्तेदारी चालली आहे. राज्यातील सत्ताधारी आपल्या खिशात असल्याने कुणीही आपले काहीच वाईट करू शकत नाही, अशा गुर्मीत ही कंपनी वावरत आहे. तोच अनुभव वास्कोतील उड्डाणपूल बांधकामादरम्यान आला असून या कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष आणि घोळामुळे केवळ काही दिवसांच्या अंतराने तब्बल दोघांचे बळी गेले आहेत. त्यात एका सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

सरकारला जनतेपेक्षा मित्र महत्त्वाचे

एवढे होऊनही पोलिसांकडून मात्र या कंपनीवर क्षुल्लक आरोप ठेऊन नाममात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा गुन्हा काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे नोंदविण्यात आला आहे. खरे तर पोलिसांनी या कंपनीवर 302 कलमाखाली गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र तसे न होता केवळ नामधारी कलमे लावून त्यांची पाठराखण करण्याचे प्रयत्न होत आहेत असेच पोलिसांची एकंदर कार्यपद्धती पाहता दिसून येत आहे. यावरून या सरकारला स्वत:च्या नागरिकांच्या जीवापेक्षा आपल्या क्रोनी कॅपिटलीस्ट मित्रांचे हित अधिक महत्त्वाचे वाटत असल्याचे सिद्ध होत आहे, असा दावा पाटकर यांनी केला. असे असले तरी एक विरोधक या नात्याने आम्ही हा विषय घसास लावणार आहोत, असे पाटकर यांनी सांगितले.

वाहतूक मंत्र्यांनाही अटक करावी 

दक्षिण गोवा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी पाटकर यांच्याच मागणीचा पुनऊच्चार करताना, एमव्हीआर कंपनीकडून राज्यात सुरू असलेली दर्जाहिन व जीवघेणी रस्ताकामे मंजूर करून घेण्यास वाहतूकमंत्री जबाबदार असून सदर कंपनीच्या संचालकांसोबतच मंत्र्यांवरही अटकेची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. पुढे बोलताना त्यांनी, सध्या गाजणाऱ्या अॅग्रीगेटर अॅपप्रकरणी सरकारवर टीका केली. खरे म्हणजे राज्यातील पर्यटक टॅक्सी आणि दुचाकी चालक हेच राज्याचे खरे पर्यटक दूत आहेत. त्यांच्या पोटावर पाय देऊन बाहेरील बड्या प्लेयरच्या फायद्यासाठी सरकार खेळत असलेली अॅग्रीगेटरची खेळी त्यांना महागात पडणार आहे, या प्रकरणी आम्ही स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या पाठिशी राहणार असल्याचे ते म्हणाले.

तत्पूर्वी बोलताना शरद चोपडेकर यांनी वास्कोत कोळसा वाहतुकीमुळे नागरिकांचे आरोग्य कशाप्रकारे दावणीला बांधण्यात आले आहे आणि शहराचाही कसा विध्वंस चालला आहे यावर उजेड टाकला. त्याचबरोबर वास्कोत विविध तेल कंपन्यांच्या गोदामातून कशाप्रकारे तेलाची हायप्रोफाईल चोरी होत आहे याचीही माहिती त्यांनी दिली. नंदादीप राऊत आणि वसंत नाईक यांनीही आपापल्या भागातील समस्या व अडचणींची माहिती दिली. या तालुक्यातील तिन्ही मतदारसंघांत डबल इंजिन सरकारचे प्रतिनिधी असतानाही विकास काही गती घेत नाही. उलटपक्षी तिघांचीही ‘दुकाने’ मात्र प्रचंड नफ्यात सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. तब्बल 100 कोटी गुंतवणुकीचा वास्कोतील बसस्थानक प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून रेंगाळत ठेवण्यात आला आहे, यासारखे या सरकारचे अन्य अपयश नसावे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.