पावसाळ्यातील आजारांवर नियंत्रणासाठी प्रतिबंधक औषधांची व्यवस्था करा
जिल्हा पंचायत सीईओंची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : पावसाळ्याला लवकर सुरुवात होणार असून डासांपासून उत्पन्न होणारे मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधक औषधांची व्यवस्था करण्यात यावी. वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित करण्यात आलेली औषधेच नागरिकांना वितरणाची व्यवस्था करावी, अशा सूचना जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांना केल्या. सीईओ शिंदे यांनी गुरुवारी जिल्हा आरोग्य खात्याच्या कार्यालयात तातडीची बैठक घेऊन आरोग्य खात्याच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम समग्र विकास कामाची चौकशी केली. यावेळी त्यांनी कार्यालयातील कागदपत्रे, प्रलंबित असलेली प्रकरणे, त्याचबरोबर आरोग्य उपक्रमांतर्गत काही सूचना दिल्या. त्याचबरोबर मागील सभेतील विषयांवरही चर्चा केली.
तोतया आरोग्य अधिकाऱ्यांकडून डेंग्यूसारख्या आजारावर औषधे वितरण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही बनावट जाहिरातींच्या मागे लागून औषधे घेण्याचे टाळावे, अशी सूचना केली. तसेच जिल्हा आरोग्य कार्यालयातील विकासासंबंधीची कामे हाती घ्यावीत, असे सूचविले. त्यानंतर, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या ‘गृह आरोग्य-घरोघरी आरोग्य’ या उपक्रमाचा आढावा घेतला. क्षयरोग नियंत्रणासाठी वयस्करांना देण्यात येणाऱ्या बीसीजी कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावाही घेतला. जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. जि. पं. चे उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद, डॉ. विश्वनाथ भोई, डॉ. विवेक होन्नळ्ळी, जिल्हा कुष्ठ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. गीता कांबळे, जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदणी देवडी, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. एस. एस. सायन्नवर, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.