‘सैन्यमाघार’ दोन स्थानी अंतिम टप्प्यात
देपसांग, डेमचोक या लडाखमधील संघर्ष बिंदूंवर प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या लडाख सीमेवर दोन स्थानी भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकींपासून मागे हटण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देपसांग आणि डेमचोक या महत्वाच्या संघर्षबिंदूंवर दोन्ही देशांची ‘सैन्यमाघार’ (डिसएंगेजमेंट) जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच पुढच्या गस्तक्षेत्रमुक्तीच्या टप्प्याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. भारत आणि चीन यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या करारानुसार ही सैन्यमाघार होत आहे.
गेल्या चार वर्षांपासून लडाख सीमेवर चार स्थानी भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकींसमोर उभ्या आहेत. याच स्थितीतून 2020 मध्ये गलवान येथे सशस्त्र संघर्ष झाला होता. त्यात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. चीनलाही आपले अनेक सैनिक गमवावे लागले होते. त्यानंतर चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या वाया गेल्या होत्या. पण या महिन्याच्या प्रारंभी दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांनी तोडगा शोधण्यात यश मिळविल्याने दोन्ही देशांमध्ये 2020 ची स्थिती पुन्हा आणण्याचा करार झाला होता. या कराराचा प्रथम टप्पा म्हणून ही सैन्यमाघार होत आहे.
अस्थायी बांधकामे हटविली
सैन्यमाघार प्रक्रियेचा प्रथम भाग म्हणून दोन्ही देशांनी गस्त क्षेत्रात गेल्या चार वर्षांमध्ये स्थापन केलेली अस्थायी बांधकामे आणि इतर साधने हटविण्यास प्रारंभ केला आहे. हे कार्य जवळपास पूर्ण होत आले आहे. या महिन्याच्या अखेरीपासून दोन्ही देशांच्या सैनिकी तुकड्यांची विशिष्ट भागांमध्ये गस्त घालण्याच्या प्रकियेचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात दोन्ही सेना 2020 च्या स्थितीपर्यंत मागे जाण्याची शक्यता आहे. हे तिन्ही टप्पे पार झाल्यानंतर संघर्षबिंदूंवर शांतता प्रस्थापित झाल्याचे निश्चित केले जाणार आहे.
काय हटविले जात आहे...
सध्या दोन्ही देश गस्तक्षेत्रात गेल्या चार वर्षांमध्ये स्थापन केलेले तंबू, प्रीफॅब्रिकेटेड बांधकामे, सैनिकांच्या वास्तव्यासाठी आणि युद्धसामग्री साठविण्यासाठी बांधण्यात आलेली स्थाने इत्यादी हटविण्याची कृती करीत आहेत. वाहनेही हटविली जात आहेत. मंगळवार, 29 ऑक्टोबरला माघारीचे प्रतिसर्वेक्षण दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे. त्यानंतर सैन्यमाघारीचा प्रथम टप्पा पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा
गस्तक्षेत्र दोन्ही सेनांकडून मुक्त करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांच्या सेनांच्या तुकड्या 2020 मध्ये संघर्षाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात ज्याप्रमाणे गस्त घालण्यात येत होती, त्या स्थितीत येतील आणि गस्त पूर्वीप्रमाणे घालण्यास प्रारंभ करतील, अशी महत्वाची घोषणा शनिवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली होती. यामुळे तणावमुक्तीच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले जाईल. तसेच संघर्षाचा भडका उडण्याचा धोकाही कमी होईल, असे तज्ञांचे मत आहे.
सावधानतेचा इशारा
लडाख सीमेवर सध्या घडणाऱ्या शांततापूर्ण घडामोडी ही सकारात्मक आणि प्रशंसनीय परिस्थिती आहे. मात्र, भारताने अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे. वेगवान हालचाली करण्याची चीनच्या सेनेची क्षमता आहे. त्यामुळे भारतीय सेना आधी मागे हटल्यास चीनची सेना वेगाने पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चीनच्या सेनेच्या हालचालींवर सातत्याने आणि बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून भारतीय सेनेलाही आवश्यकता भासल्यास वेगाने पुढे जाण्याची सज्जता ठेवावी लागेल, असे मत अनेक माजी सेनाधिकारी आणि सामरिक अभ्यासकांनी व्यक्त केले असून सावधानतेचा इशारा दिला आहे.
प्रथम टप्प्यानंतर महत्वाच्या हालचाली
ड लडाख सीमेवर सेनांकडून अस्थायी बांधकामे हटविण्याचे कार्य जवळपास पूर्ण
ड या महिन्याच्या अखेरपासून 2020 ची स्थिती निर्माण होण्यास प्रारंभ होणार
ड आज मंगळवारी दोन्ही सेनांचे अधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी केली जाणार