For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मूमध्ये सैन्याची जमवाजमव

07:00 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मूमध्ये सैन्याची जमवाजमव
Advertisement

200 हून अधिक वाहनांमधून सैनिक : 500 पॅरा कमांडो तैनात : काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करण्याची योजना

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली, जम्मू

जम्मूमध्ये पाकिस्तान सातत्याने दहशतवादी घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यांत शेजारी देशाच्या ना‘पाक’ कारवाया वाढल्या असतानाच आता भारतीय सुरक्षा दलांनी जम्मूमधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी संपूर्ण योजना तयार केली आहे. सुरक्षा दलांचे संपूर्ण लक्ष खोऱ्यातील घुसखोरी थांबवणे आणि दहशतवाद्यांचे स्थानिक नेटवर्क नष्ट करण्यावर आहे. जम्मूमधून दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी 200 हून अधिक वाहनांमधून सैनिक पाठवण्यात आले आहेत. तसेच शे-पाचशे विशेष पॅरा कमांडो तैनात करून दहशतवाद्यांचे कारनामे उधळून लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Advertisement

जम्मूमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पॅरा स्पेशल फोर्सचे सुमारे 500 कमांडो तैनात केले आहेत. पाकिस्तानचे 50 ते 55 दहशतवादी जम्मू भागात लपून बसल्याचा संशय आहे. दहशतवादी नेटवर्क सक्रिय करण्यासाठी ते पुन्हा भारतात घुसले आहेत. पाकिस्तानी लष्कर जम्मूमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना शस्त्रे, प्रशिक्षण, वाटाघाटीसाठी हायटेक गॅझेट्स आणि इतर सर्व मदत पुरवत आहे. लष्कराला यासंबंधी गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर लष्कराने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या टिप्सच्या अनुषंगाने आता सैन्याची जमवाजमव सुरू झाली आहे. याचदरम्यान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हेसुद्धा जम्मूमध्ये दाखल असून दहशतवादविरोधी कारवाईला वेग आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जनरल द्विवेदी यांनी गेल्या आठवड्यातच लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला असून त्यांचा आठवडाभरातील हा दुसरा जम्मू काश्मीर दौरा आहे.

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी उच्चस्तरीय प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीवर लष्कर काम करत आहे. जम्मूमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांबाबत लष्करप्रमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी लष्कराने आपल्या 3,500 ते 4,000 सैनिकांची ब्रिगेड आधीच मैदानात उतरवली आहे. याशिवाय, लष्कराकडे जम्मूमध्ये आधीच दहशतवादविरोधी पायाभूत सुविधा आहे, ज्यामध्ये रोमियो आणि डेल्टा फोर्स तसेच राष्ट्रीय रायफल्सच्या दोन दलांचा समावेश आहे.

जम्मू भागात पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांचे स्थानिक नेटवर्क पुन्हा एकदा हातपाय पसरू लागले आहे. हे नेटवर्क जम्मू, राजौरी, पूंछ, रियासी, उधमपूर, कठुआ, दोडा, किश्तवार, जम्मू आणि रामबन या 10 पैकी नऊ जिह्यांमध्ये स्थापित करण्यात आले आहे. हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचे आव्हान आता भारतीय सुरक्षा दलासमोर आहे. काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने जम्मूला लक्ष्य करण्यास सुऊवात केली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी हे नेटवर्क सक्रिय केले. त्यांच्या मदतीने दहशतवाद्यांनी 2020 मध्ये पुंछ आणि राजौरी येथे लष्करावर मोठे हल्ले केले. त्यानंतर उधमपूर, रियासी, दोडा आणि कठुआ यांना लक्ष्य करण्यात आले.

2020 पर्यंत जम्मू भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. मात्र, गलवान प्रकरणानंतर चीनच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी येथील लष्कर हटवून लडाखमध्ये पाठवण्यात आले. भारताच्या या हालचालीचे दहशतवाद्यांनी संधी साधून काश्मीरमधून जम्मूमध्ये आपले तळ हलवले. त्यांचे जुने लोकल नेटवर्क आधीपासूनच होते, ते पुन्हा सक्रिय झाल्यामुळे कुरापती वाढल्या आहेत. या कुरापतींना आता जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी नजिकच्या काळात भारताकडून मोठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे समजते.

दहशतवाद्यांच्या हाती अद्ययावत रायफल्स

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे माजी किंवा विद्यमान सैनिकही आहेत. रियासी हल्ल्यानंतर मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून सापडलेली शस्त्रे आणि सॅटेलाईट फोन हे याचा भक्कम पुरावा मानला जात आहे. त्यांची हल्ल्याची पद्धत पाक लष्कराच्या पॅरा ट्रूपर डिव्हिजनसारखी आहे. जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये 17 जुलै रोजी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून स्टेयर एयूजी असॉल्ट रायफल सापडली आहे. ही ऑस्ट्रियन रायफल आहे. ही रायफल जगातील सर्वात धोकादायक रायफलमध्ये गणली जाते. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांमध्ये लष्कर आणि पोलिसांकडून याचा वापर केला जात आहे.

Advertisement
Tags :

.