कारगिल विजयाची ‘पंचविशी’
भारतीय लष्कराची अप्रतिम मोहीम, बोफोर्स तोफांनी दाखवली जादू : हवाई दलाच्या मिग-21 विमानांनी पाकिस्तानचे मोडले कंबरडे,भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे लढाईत मोठे नुकसान,60 दिवस चाललेल्या युद्धात अखेर पाकिस्तानने टेकले गुडघे
1999 च्या कारगिल युद्धाला 26 जुलै रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘कारगिल विजय दिवस’ हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाचा दिवस आहे. भारतात 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झाले होते. हे युद्ध लडाख भागातील कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चालले. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावले. ‘ऑपरेशन विजय’चा भाग म्हणून टायगर हिलसह लष्कराच्या इतर सर्व चौक्मयांवर कब्जा मिळविला. या युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल विजय दिवस हा युद्धात हुतात्मा झालेल्या भारतीय जवानांच्या सन्मानासाठी, त्यांना श्र्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने कारगिल लढाईचा घेतलेला आढावा.
कारगिलची लढाई... 1999 ची घटना... काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात मे ते जुलै 1999 दरम्यान घडलेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्ष... पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर देत मिळविलेला विजय म्हणजे भारताचे मोठे यश. पाकिस्तानी लष्कर आणि काश्मिरी दहशतवाद्यांनी एलओसी ओलांडून भारतीय भूमीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्कराच्या शूर जवानांनी या लढाईत पाकिस्तानचा पराभव तर केलाच, पण आपल्या शौर्याने इतिहासाच्या पानात आपले स्थान निर्माण केले. या लढ्यालाच ‘ऑपरेशन विजय’ असे संबोधले जाते. या लढाईतील विजयाच्या आठवणी तेवत ठेवण्यासाठी देशात दरवर्षी 26 जुलै रोजी ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. यंदाही हा दिवस आता उंबरठ्यावर आला आहे. यंदा कारगिल विजय दिवसाची ‘पंचविशी’ साजरी होत असल्याने देशवासीयांचा आनंद वेगळाच आहे.
कारगिल युद्धाचा प्रारंभ
पाकिस्तानने पाच हजारांहून अधिक सैनिकांसह कारगिलच्या उंच टेकड्यांवर घुसखोरी करून कब्जा केल्यानंतर 3 मे 1999 रोजी भारत-पाकिस्तान सैन्यादरम्यान युद्ध सुरू झाले होते. भारत सरकारला घुसखोरीची माहिती मिळाल्यावर पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन विजय’ सुरू करण्यात आले. सुऊवातीला ही एक घुसखोरी असून ती रोखली जाईल, असे भारताला वाटले. मात्र, नियंत्रण रेषेवरील स्थिती आणि घुसखोरांच्या नियोजित रणनीतीचा मागोवा घेतल्यानंतर हा मोठ्या हल्ल्याचा कट असल्याचा अंदाज भारतीय लष्कराला आला. त्यानंतर भारत सरकार आणि लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ची आखणी केली. पाकिस्तानी सैन्याने आमच्या काही चौक्मया काबीज केल्याचे भारतीय लष्कराला कळताच भारताने पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्याची रणनीती अवलंबिली.
सुमारे तीन महिने चाललेल्या या युद्धात देशाच्या अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, या संपूर्ण युद्धात टायगर हिलने महत्वाची भूमिका बजावली. टायगर हिलच्या हौतात्म्याला आणि या संपूर्ण युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना संपूर्ण देश सलाम करतो. युद्धादरम्यान टायगर हिलवर शत्रूंचा ताबा होता. यावेळी ते सतत बॉम्बस्फोट आणि गोळ्या झाडत होते. टायगर हिल्स जिंकणे हा कारगिल युद्धातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट होता, यात शंकाच नाही. एकवेळ अशी आली की, टोटोलिंग आणि आसपासच्या इतर टेकड्यांवरून शत्रूंना मागे ढकलले गेले. परंतु टायगर हिल्स काबीज करणे अशक्मय वाटू लागले. पण तरीही देशाचे शूरवीर विजय मिळवण्यावर ठाम राहिल्यामुळे यश मिळत गेले.
गुप्तचर यंत्रणेचे अपयश...
कारगिल ताब्यात घेण्याची पाकिस्तानची कारवाई जानेवारी 1999 मध्ये सुरू झाली. परंतु भारताला मे 1999 च्या उत्तरार्धात याची माहिती मिळाली. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले होते. जानेवारी ते मे असे सहा महिने पाकिस्तानी सैनिक आपल्या क्षेत्रात असूनही त्याची वेळीच माहिती न मिळणे ही भारतीय गुप्तचर यंत्रणांची एक मोठी चूक होती.
लढाईत एक विऊद्ध नऊ सैनिक
भारतीय लष्कर सामान्यत: कोणत्याही लढाईसाठी 3:1 च्या प्रमाणात आक्रमणकर्त्याला अवलंबते. म्हणजे शत्रूच्या एका सैनिकाविऊद्ध भारतीय लष्कराचे तीन सैनिक तैनात केले जातात. ही रणनीती पर्वतीय क्षेत्रांमध्ये बदलते. पर्वतांमध्ये आक्रमणकर्ता आणि बचावपटूचे गुणोत्तर 9:1 आहे. याचा अर्थ पर्वतीय लढाईत शत्रूच्या एका सैनिकाविऊद्ध नऊ भारतीय सैनिक तैनात असतात. कारगिलमध्येही हीच रणनीती अवलंबण्यात आली होती.
आव्हानात्मक ठिकाण
कारगिलचे सर्वात मोठे आव्हान हे युद्धाच्या ठिकाणाचे होते. युद्धाच्या काळात शत्रू डोंगरमाथ्यावर आणि भारतीय सैनिक पायथ्याशी होते. अशा शत्रूंचा सामना करण्यासाठी भारतीय लष्करासाठी सर्वात उपयुक्त शस्त्र म्हणजे बोफोर्स तोफा. या तोफांचे वैशिष्ट्या म्हणजे ते अगदी उंच लक्ष्यांवरही बॉम्बवर्षाव करू शकत होते. बोफोर्स वजनाने खूपच हलके असल्यामुळे या युद्धाच्या काळात त्यांची मदत बहुमूल्य ठरली.
मिग-21, बोफोर्सची झुंज...
कारगिल युद्ध सुऊवातीला भारतासाठी खूप कठीण होते. परंतु बोफोर्स आणि हवाई दलाच्या प्रवेशाने संपूर्ण चित्र बदलले. बोफोर्स तोफांचे हल्ले इतके भयंकर आणि अचूक होते की त्यांनी पाकिस्तानी चौक्मया पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. तसेच हवाई दलाच्या मिग-21 विमानांनी पाकिस्तानचे कंबरडेच मोडून टाकले होते. पाकिस्तानी सैनिक मोठी रसद न घेता लढत असल्यामुळे ते भारतीय सैनिकांच्या धैर्याची बरोबरी करू शकत नव्हते. भारतीय सुरक्षा दलांच्या व्यापक मोहिमेमुळे पाकिस्तानी सैन्याला अवघ्या काही दिवसांमध्ये सळो की पळो करून सोडले होते.
भारताचे नुकसान, पण पाकिस्तान बरबाद
कारगिल युद्धात भारताचे खूप नुकसान झाले, तर पाकिस्तान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या युद्धात 527 भारतीय जवान हुतात्मा झाले. तर पाकिस्तानचे 2,700 ते 4,000 सैनिक मारले गेले. युद्धानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय आणि आर्थिक अस्थिरता वाढली आणि नवाझ शरीफ यांचे सरकार हटवून परवेझ मुशर्रफ सत्तेवर आले. तर भारतात युद्धानंतर देशभक्ती शिगेला पोहोचण्याबरोबरच अर्थव्यवस्थेलाही खूप बळ मिळाले.
धडा घेत केल्या सुधारणा...
कारगिल युद्धातून धडा घेत भारताने सीमेवर सुरक्षेसाठी ठोस व्यवस्था केली. एकीकडे सरकारने संरक्षण बजेट वाढवत असतानाच लष्कराची क्षमता वाढविण्याचे कामही सुरू केले. युद्धादरम्यान अनेक अनियमितता उघडकीस आल्या आणि त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. याशिवाय सीमेवर सतत पाळत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. कारगिल युद्धाने भारताला काही काळानुरुप धडे दिले. आपल्या चुकांपासून धडा घेत बऱ्याच सुधारणा केल्याने सद्यस्थितीत भारत पाकिस्तान आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर शत्रूंना सहज हाताळू शकतो.
शांतता करारानंतरही पाकिस्तानची घुसखोरी
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतरही दोन्ही देशांच्या सैन्यात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला. अणुचाचण्यांमुळे दोन्ही देशातील तणाव वाढला. अशावेळी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही देशांनी फेब्रुवारी 1999 मध्ये लाहोर येथे घोषणापत्रावर स्वाक्षरी केली. या घोषणापत्रात काश्मीरच्या मुद्यावर दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून शांततेने मार्ग काढतील, असा करार करण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा कुरघोडी करायला सुऊवात केली. पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न कळवता युद्धाची आखणी केली होती, असे सांगितले जाते.
पाकिस्तानचा इरादा
भारताच्या उत्तरेकडील टोकावरील सियाचीन ग्लेशियरवर ताबा मिळवण्याचा पाकिस्तानचा हेतू होता. पाकिस्तानी सैनिकांना सियाचीनच्या टेकड्यांवर यायचे होते. या ठिकाणावरून ते लडाखकडे जाणाऱ्या ताफ्यांची हालचाल रोखू शकतील आणि भारताला सियाचीन सोडण्यास भाग पाडले जाणार होते. 1984 मध्ये भारताने सियाचीन ताब्यात घेतल्याचे दु:ख मुशर्रफ यांना सलत होते. त्यावेळी ते पाकिस्तानच्या कमांडो फोर्समध्ये मेजर म्हणून कार्यरत होते. ती जागा हस्तगत करण्याचा त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळू शकले नाही.
काही ठळक नोंदी...
- या युद्धातील सर्व लढवय्ये काश्मिरी दहशतवादी असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र, या युद्धात सापडलेली कागदपत्रे आणि पाकिस्तानी नेत्यांच्या वक्तव्यांवरून या युद्धात पाकिस्तानी लष्कराचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले होते.
- 9 जून ही या युद्धातील महत्त्वाची तारीख ठरली. 9 जूनपासूनच भारतीय जवानांनी प्रमुख शिखरांवर आपली मजबूत पकड असल्याचा दावा करून विजयाची सुऊवात केली होती. तोपर्यंत देशाने आपले 527 जवान गमावले होते.
- युद्धात भारतीय जवानांचे हल्ले इतके जोरदार होते की पाकिस्तानी सैनिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. या युद्धात पाकिस्तानने अमेरिका आणि चीनसारख्या देशांची मदत मागितली. पण दोन्ही देशांनी कोणतीही मदत नाकारली होती.
- 18,000 फूट उंचीवर हे युद्ध 84 दिवस चालले. या काळात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांवर सुमारे 2.5 लाख बॉम्ब-तोफगोळ्यांचा वर्षाव केला. या काळात 300 हून अधिक तोफगोळे, मोर्टार आणि रॉकेट लाँचर्समधून दररोज सरासरी 5,000 हून अधिक वेळा गोळीबार करण्यात आला. या लढाईतील सर्वात महत्त्वाच्या 17 दिवसांमध्ये प्रतिमिनिट सुमारे एक राऊंड गोळीबार करण्यात आला.
- जयनारायण गवस