मणिपूरमध्ये पुन्हा लष्कराला पाचारण
सापडले आणखी दोन मृतदेह : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सुरक्षेचा आढावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, इंफाळ
मणिपूरची राजधानी इंफाळ येथे हिंसक दंगली होत असून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी भारतीय सेनेला पाचारण करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात एक महिला आणि एका बालकाचा मृत्यू झाल्याने वातावरण तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश सेनेला देण्यात आला आहे.
आतापर्यंत पाच नागरिकांचे मृतदेह आढळले आहेत. शनिवारी बराक नदीत तीन मृतदेह आढळून आल्यानंतर हिंसाचार उफाळून आला. इंफाळमध्ये अनेक घरे आणि दुकाने जाळण्यात आली. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेत्यांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात आले होते. दंगली घडविल्याच्या आरोपाखाली 27 जणांना अटक करण्यात आली आहे. 25 वर्षांची एक महिला आणि तिची दोन मुले अद्याप सापडलेली नसल्याने तणावात भर पडली आहे. कुकी समुदायाचे फुटीरवादी हा हिंसाचार करण्यात आघाडीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुरुषाचा मृतदेह सापडला
कुकी-झो समुदायाच्या एका पुरुषाचा मृतदेह रविवारी जिरीबाम येथे आढळून आला. त्याचे हात मागे बांधून त्याच्या कपाळात गोळी घातल्याचे स्पष्ट झाले आहे. 7 नोव्हेंबरपासून राज्यात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 20 जण ठार झाले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. राज्याच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण इंफाळमध्येही संचारबंदी आहे.
आसाम रायफल्सच्या तुकड्या
सुरक्षा व्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी आसाम रायफल्सच्या काही तुकड्या राजधानी इंफाळमध्ये आणण्यात आल्या आहेत. आफ्स्पा कायदा पुन्हा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुमती न घेता दंगलखोरांवर गोळीबार करण्याचा अधिकार सैनिकांना देण्यात आला आहे.
काँग्रेसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांची भेट घडवून आणावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्याकडे केली आहे. अशी बैठक आयोजित करण्यात आल्यास मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करता येईल आणि काही तोडगा काढता येईल, असे प्रतिपादन करण्यात आले आहे. आम्ही मणिपूरला वाचवू शकत नसू तर आमदार म्हणून काम करण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त प्रश्न काँग्रेस आमदारांनी केला आहे.
संघाच्या कार्यालयाची तोडफोड
दंगलखोरांनी इंफाळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात घुसून तेथे तोडफोड केल्याचे दिसून आले आहे. सर्व पक्षांच्या मिळून एकंदर 13 नेत्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांना दंगलखोर जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रूधुराची नळकांडी फोडावी लागली. एकंदर स्थिती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
गोळीबारात दंगलखोर ठार
जिरीबाम येथे सोमवारी सुरक्षा सैनिक आणि दंगलखोर यांच्यातील चकमकीत 1 दंगलखोर ठार झाला. दंगलखोर जमावाने सरकारी आणि खासगी मालमत्तांना आगी लावण्यास प्रारंभ केल्याने सैनिकांना गोळीबार करावा लागला. या घटनेनंतर काही काळ जिरीबाम भागात शांतता होती. मात्र, पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली. सुरक्षा सैनिक आणि अर्धसैनिक दले परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही स्थानिक संघटना त्यांना साहाय्य करीत असल्याची माहिती आहे.
कायदा-सुव्यवस्था स्थिती नाजूक
ड मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती चिंताजनक
ड आसाम रायफल्सच्या काही तुकड्या इंफाळ आणि अन्यत्र नियुक्त
ड विविध राजकीय पक्षांच्या 13 नेत्यांच्या घरांवर हिंसाचाऱ्यांचा हल्ला
ड काँग्रेसकडून मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यासाठी मागणी
ड सैनिकांच्या गोळीबारात एका दंगलखोराचा मृत्यू, काहीजण जखमी